सातत्याने पक्षविरोधी विधानं केल्याप्रकरणी जनता दल यूनायटेड (जेडीयू) चे उपाध्यक्ष राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर उर्फ ‘पीके’ यांची पक्षातून नुकतीच हकालपट्टी करण्यात आलेली आहे. मात्र, या घटनेला एक दिवसही उलटत नाही तोच त्यांच्या स्वागतासाठी आता राष्ट्रीय जनता दला (राजद) ने दार उघडले आहे.

राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी प्रशांत किशोर यांना आपल्या पक्षात  येण्याची ऑफर दिली आहे. प्रशांत किशोर आमच्याबरोबर येऊ शकतात, त्यांचे ‘राजद’मध्ये स्वागत आहे. असं तेजप्रताप यादव यांनी म्हटलं आहे.

तर, आपली पुढील रणनीती काय असणार याबाबत ११ फेब्रवारी रोजी पाटणा येथे अधिकृतरित्या आपण बोलणार आहोत.  मात्र, तोपर्यंत आपण कोणाशीही बोलणार नसल्याचं प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं आहे.

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि माजी राज्यसभा खासदार पवन वर्मा यांची जनता दल यूनायटेडमधून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षाध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही कारवाई केली आहे. नितीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर लगेचच प्रशांत किशोर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. “धन्यवाद नितीश कुमार. बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. देव तुमचं भलं करो.” असं प्रशांत किशोर यांनी ट्विट केलं होतं.

जनता दल यूनायटेडचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी सुरूवातीपासूनच सीएए व एनआरसी बद्दल विरोध दर्शवलेला आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्यात शाब्दीक युद्ध रंगल्याचेही दिसून आले होते. नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधत, जे पक्ष सोडून जाऊ इच्छित आहेत त्यांनी जावे, असे म्हटले होते. तसेच, तत्कालीन भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या सांगण्यावरून प्रशांत किशोर यांना आपण पक्षात घेतले होते, असा देखील त्यांनी खुलासा केला होता.