कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने दिवाळीनंतर होणा-या दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसचे दिवाळे निघण्याची भीती खुद्द मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना सतावत आहे. प्रचाराची धामधूम सुरु असताना दिल्लीत कांद्याने प्रतिकिलो ९० रुपयांचा दर गाठला आहे. कांद्यामुळे होणारी डोकेदुखी टाळण्यासाठी १९९८मध्ये भाजपचे मदनलाल खुराना मुख्यमंत्री असताना कांदा ४०० रुपये प्रतिकिलो होता, असा टोला दीक्षित यांनी लगावत या मुद्दयावर राजकारण न करण्याचे आवाहन भाजपला केले, तर कांद्याची दरवाढ रोखण्यात अपयशी ठरलेल्या काँगेसला जनता धडा शिकवेल, असा प्रतिहल्ला प्रदेशाध्यक्ष विजय गोयल यांनी चढवला.
दिल्लीत गगनाला भिडलेल्या कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय कॅ्रबिनेट सचिव अजित कुमार सेठ यांनी शुक्रवारी राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. कांदा भाववाढीवरून ‘आम आदमी पक्षा’ने मात्र काँग्रेस व भाजपविरोधात जोरदार प्रचार सुरू केला आहे.  देशातील कांदा उत्पादक क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले.  परिणामी कांद्याचे उत्पादन घटल्याचा दावा मुख्यमंत्री दीक्षित करत आहेत. मात्र ्न‘आम आदमी’च्या अरविंद केजरीवाल यांनी हा दावा धूडकावून लावला. वीज कंपन्यांशी संगनमत करून राज्य सरकारने सामान्य नागरिकांना महाग वीज दिली, त्याचप्रमाणे कांद्याच्या दलालांवर अंकूश न लावल्याने कांदा महागला, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, राज्य सरकारच्या योजनेतून चालवण्यात येणाऱ्या मदर डेअरी व केंद्रीय भंडारात कांदा ७० रुपये किलो दराने विकला जात आहे. मात्र चांगल्या दर्जाचा कांदा नसल्याने ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.