Operation Sindoor China-Pakistan: ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानला चीनने भारताशी संबंधित माहिती पुरवल्याचा आणि तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन पुरवल्याचे विधान आज उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी केले होते. या विधानावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणाले की, पाकिस्तान हे एक आव्हान असून त्यांना चीनकडून प्रोत्साहन दिले जात आहे.

जयराम रमेश म्हणाले की, उपलष्करप्रमुखांनी जे सांगितले आहे, तो एक महत्त्वाचा खुलासा आहे. आम्हाला आणि सर्व तज्ज्ञांना असे वाटले की ऑपरेशन सिंदूरमध्ये चीन आणि पाकिस्तानमध्ये एक नवीन जुगलबंदी दिसून आली आणि त्याचा आपल्यावरही परिणाम झाला. परंतु आज हे स्पष्ट झाले आहे की, ही लढाई पाकिस्तानी हवाई दलाशी नव्हे तर चीनशी होती.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पुढे म्हटले की, चीनने पाकिस्तानी हवाई दल पूर्णपणे ताब्यात घेतले आहे. त्यामुळे काँग्रेस वारंवार संसदेत यावर चर्चा करण्याची मागणी करत आहे. ते म्हणाले की, सामूहिक ठराव करण्यासाठी संसदेत चर्चा झाली पाहिजे.

यावेळी जयराम रमेश यांनी दावा केला की, चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात बैठक झाली आहे. चीन भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

जयराम रमेश म्हणाले की, संसदेचे अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार आहे आणि आम्हाला माहिती मिळाली आहे की ते आणखी ४ दिवसांसाठी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे वेळेची कमतरता नाही. असे अनेक मुद्दे आहेत, ज्यावर चर्चा झाली पाहिजे.

ऑपरेशन सिंदूर कसे थांबवण्यात आले? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १७ वेळा दावा केला की त्यांनी ते थांबवले. मग त्यांनी ते का थांबवले? ते कसे थांबवले? यावर चर्चा झाली पाहिजे. आता २१ जुलैदरम्यान अमेरिकेसोबत व्यापार करार होऊ शकतो. त्यावरही चर्चा झाली पाहिजे. असे अनेक मुद्दे आहेत, ज्यावर चर्चा झाली पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९ जुलै रोजी संसदेच्या अधिवेशनापूर्वी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीबाबत जयराम रमेश म्हणाले की, आम्ही सर्वपक्षीय बैठकीला जातो, ती दीड तास चालते. जे.पी. नड्डा येतात, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येतात, किरण रिजिजू येतात. प्रत्येकजण आपले मत मांडतो, ते नोंदवतो, पण त्यावर पुढे काहीही होत नाही.