स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन केल्यानंतर एका सरकारी शाळेत अफू (Opium ) आणि पोपीचे (Poppy) वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील गुडमालानी गावात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
शिक्षणाधिकारी ओमप्रकाश विश्नोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाडमेरच्या गुडमालानी भागातील एका सरकारी शाळेत ही घटना घडली. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर काही लोक शाळेत पोहोचले होते. ते एकमेकांना अफू देत होते. या घटनेची माहिती मिळताच ते शाळेत पोहोचलो. मात्र, तोपर्यंत तिथे कोणीही नव्हतं. या घटनेची चौकशी सुरू असून आम्ही विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.
पोपी (Poppy) ही फुलांची वनस्पती आहे. त्याच्या रोपातून अफू काढली जाते. अफूची लागवड आणि व्यापार करण्यासाठी सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. वाळलेल्या पोपीपासून मॉर्फिन आणि कोडीन काढले जातात, जे अनेक औषधांमध्ये वापरले जातात.