Khawaja Asif On India and Afghanistan : भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. मात्र, तरीही पाकिस्तानकडून भारताविरोधात सातत्याने गरळ ओकण्याचं काम अद्यापही सुरूच आहे. कधी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर तर कधी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे भारताच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य करत असल्याचं दिसून येत आहे. एवढंच काय तर थेट भारताला धमकावण्याचा प्रयत्नही करत आहेत.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आता पुन्हा एकदा भारतासह अफगाणिस्तानला धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे. एका पाकिस्तानी न्यूज चॅनलच्या मुलाखतीत बोलताना ख्वाजा आसिफ यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ‘आमचं सैन्य दोन्ही आघाड्यांवर युद्धासाठी सज्ज आहे’, अशा प्रकारचं वक्तव्य ख्वाजा आसिफ यांनी केलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांशी संबंधित कोणत्या बैठकीत सहभाग घेतला होता का? असं विचारलं असता यावर संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं की, “यासाठी एक रणनीती आहे. सार्वजनिकरित्या आम्ही सध्या त्यावर चर्चा करत नाहीत. कोणत्याही परिस्थितीसाठी आम्ही तयार आहोत. आम्ही युद्धासाठी तयार आहोत, याबद्दल कोणतीही शंका नाही”, असं ख्वाजा आसिफ म्हणाले आहेत.
ख्वाजा आसिफ यांची चिथावणीखोर वक्तव्य काय आहेत?
काही दिवसांपूर्वी ख्वाजा आसिफ यांनी एक चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. ‘आता युद्ध झालं तर भारत स्वतःच्या लढाऊ विमानांच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल’, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं होतं. दरम्यान, त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा ख्वाजा आसिफ यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलं होतं की, ‘औरंगजेबाचा काळ सोडला तर भारत कधीही एकसंध नव्हता.’