Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. दरम्यान, यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात मोठे निर्णय घेत २३ एप्रिल रोजी पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले. तसेच सिंधू पाणी करारही स्थगित केला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

यानंतर आता भारताने पाकिस्तानला आणखी एक दणका दिला आहे. पाकिस्तानी विमानांसाठी भारताने आपलं हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी त्यांचं हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर भारतानेही आपलं हवाई क्षेत्र पाकिस्तानी विमानांसाठी बंद केलं आहे. २३ मे पर्यंत भारताचं हवाई क्षेत्र पाकिस्तानसाठी बंद असणार आहे. त्यामुळे याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.

पाकिस्‍तानने भारताच्या विमानांना पाकिस्‍तानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश बंदी केली होती. आता पाकिस्तानच्या त्या निर्णयाला भारतानेही जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, “भारताने पाकिस्तानच्या विमान कंपन्यांसाठी आणि लष्करी उड्डाणांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद करण्यासाठी हवाई मिशनला (NOTAM) नोटीस जारी केली आहे.” दरम्यान, भारताच्या या निर्णयाचा पाकिस्तानी विमान कंपन्यांना आर्थिक भूर्दंड बसण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तानी विमानांना आता लांबचा मार्ग अवलंबवावा लागणार आहे.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. भारताने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देत सिंधू पाणी करारही स्थगित केला. त्यानंतर आता भारताने पाकिस्तानच्या विमान कंपन्यांसाठी आणि लष्करी उड्डाणांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलं आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे.