वॉशिंग्टन / नवी दिल्ली : एकीकडे दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला जगात एकटे पाडण्याचा प्रयत्न भारताकडून होत असतानाच आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख सय्यद असीम मुनीर यांना अमेरिकेच्या ‘आर्मी डे’साठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण दिल्याची माहिती आहे. भारताने जगभरात शिष्टमंडळे पाठवून पाकिस्तानचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारसाठी हा राजनैतिक धक्का नाही का, असा सवाल करत काँग्रेसने बुधवारी टोला लगावला.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये १४ जून रोजी ‘आर्मी डे’चा सोहळा होणार आहे. यंदा या कार्यक्रमाचे २५०वे वर्ष असल्याने त्याला खास महत्त्वदेखील आहे. या कार्यक्रमाला मुनीर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज, गुरुवारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख अमेरिकेत दाखल होण्याची शक्यता आहे. यावेळी पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी अमेरिका आग्रह धरेल, अशी शक्यता वर्तवली जात असली तरी पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर मुनीर यांना दिलेल्या आमंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच ‘भारताशी सौहार्दाचे संबंध असले तरी अमेरिका पाकिस्तानशी संबंध ठेवणार नाही, असे होऊ शकणार नाही,’ असे अमेरिकेच्या लष्कराचे जनरल मायकेल कुरिला यांनी म्हटले आहे. दहशतवाद विरोधी मोहिमेत पाकिस्तान सक्रिय असल्याचे प्रमाणपत्रही त्यांनी देऊ केले आहे. यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारला कानपिचक्या देत आता पंतप्रधान व त्यांचे समर्थक काय प्रतिक्रिया देणार असा सवाल उपस्थित केला आहे.

पहलगाम हल्ल्यापूर्वी या व्यक्तीने (मुनीर यांनी) अतिशय भडक भाषा वापरली होती. अखेर अमेरिकेच्या मनात काय आहे? हा भारतासाठी आणखी एक मोठा राजनैतिक झटका नव्हे काय? – जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस