पीटीआय, इस्लामाबाद

पाकिस्तानने शुक्रवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या छुप्या तळांवर हवाई हल्ले केले. त्यामध्ये तीन क्रिकेटपटूंसह अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून, कतारमध्ये होणाऱ्या अपेक्षित चर्चेवर अनिश्चिततेचे सावट पडले आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यानचा ४८ तासांचा शस्त्रविराम शुक्रवारी संपल्यानंतर दोन्ही बाजूंकडून त्याला मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ कतारची राजधानी दोहा येथे होणाऱ्या चर्चेपर्यंत निर्धारित करण्यात आली होती. त्यापूर्वी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा राज्यामधील अफगाणिस्तानला लागून असलेल्या उत्तर वझिरिस्तान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते.

पाकिस्तानच्या ‘द डॉन’ या वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानच्या अंगूर अड्डा भागाला लक्ष्य केले. तसेच पाकटिका प्रांतातील उर्गुन आणि बारमाल जिल्ह्यांतील दहशतवाद्यांच्या छुप्या तळांवर हल्ले केले. यामध्ये हाफिज गुल बहादूर गटाच्या तळावर अचूक हल्ले केल्याचा दावा पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी केला. त्यामध्ये १० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला.