Suicide Bomber Rammed Explosive Vehicle Into Pakistani Military Convoy: वझिरीस्तान आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचा पाकिस्तानी लष्कराचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी फेटाळून लावला आहे. काल (शनिवारी) खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात पाकिस्तानी लष्करी ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला होता, ज्यात पाकिस्तानी लष्कराच्या १६ जवानांचा मृत्यू झाला आहे.

“२८ जून रोजी वझिरीस्तान आत्मघातकी हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरणारे पाकिस्तानी लष्कराचे अधिकृत निवेदन आम्ही पाहिले. आम्ही हा आरोप स्पष्टपणे नाकारतो,” परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दहशतवादी हल्ल्यांशी सतत झुंजणाऱ्या पाकिस्तानमध्ये शनिवारी पुन्हा एकदा मोठा आत्मघातकी हल्ला झाला होता. एएफपी वृत्तसंस्थेने स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की शनिवारी खैबर पख्तूनख्वा येथील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात हा आत्मघातकी स्फोट झाला. या हल्ल्यात आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन लष्कराच्या ताफ्यावर धडकावले.

आतापर्यंत या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे किमान १६ जवान ठार झाले आहेत आणि २० जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो, असे म्हटले जात आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले की, स्फोट इतका शक्तिशाली होता की जवळच्या दोन घरांचे छत कोसळले आणि त्यात सहा मुले जखमी झाली आहेत.

या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान तालिबानच्या हाफिज गुल बहादूर या संघटनेने स्वीकारली आहे. २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यापासून पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या भागात वारंवार दहशतवादी हल्ले होत आहेत.

पाकिस्तानचा आरोप आहे की अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर त्यांच्याविरुद्ध दहशतवादी हल्ले करण्यासाठी केला जात आहे, परंतु तालिबानने हे आरोप सातत्याने नाकारले आहेत.

दरम्यान, या वर्षी मार्चमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले होते आणि त्यांनी मोठ्या संख्येने पाकिस्तान सैन्याच्या जवानांना ठार केल्याचा दावा केला होता.

याआधी खैबर पख्तूनख्वा येथील बन्नू येथील आर्मी कॅन्टोन्मेंटवर एक मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये १६ दहशतवाद्यांसह पाच जवान आणि १३ नागरिकांचाही मृत्यू झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केवळ बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच नव्हे, तर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, इस्लामिक स्टेट खोरासान आणि अफगाण तालिबान देखील पाकिस्तानसाठी समस्या बनले आहेत.