पीटीआय, इस्लामाबाद
भारताने आम्हाला थोडीशीही चिथावणी दिली तरी आम्ही त्याला निर्णायक उत्तर देऊ, अशी फुशारकी मारत पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी शनिवारी भारताला धमकी दिली. दोन्ही देश अण्वस्त्रधारी असून युद्धाला कोणताही वाव नाही, असा दावा जनरल मुनीर यांनी केला. पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी भारत दहशतवादाचा हत्यार म्हणून वापर करत असून त्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर केला जातो, असा आरोपही त्यांनी केला.
खैबर पख्तुनख्वामधील ॲबोटाबादच्या काकुल येथील ‘पाकिस्तान लष्करी अकादमी’ (पीएमए) या पाकिस्तानच्या प्रमुख प्रशिक्षण केंद्रातून येथे लष्कराच्या जवानांच्या दीक्षांत सोहळ्याच्या वेळी जनरल मुनीर बोलत होते. ते म्हणाले की, “आम्ही कधीही घाबरणार नाही, कोणत्याही धमक्यांचा आमच्यावर परिणाम होणार नाही आणि अगदी लहानशा चिथावणीलाही मागेपुढे न पाहता आम्ही निर्णायक उत्तर देऊ.”
लष्करी संघर्षात विजयाचा दावा मे महिन्यात दोन्ही देशांदरम्यान झालेल्या लष्करी संघर्षादरम्यान पाकिस्तानच्या लष्कराने उल्लेखनीय व्यावसायिकतेचे आणि दूरगामी क्षमतांचे दर्शन घडवले, असे ते म्हणाले. या संघर्षात पाकिस्तानी सैन्याची संख्या लहान असतानाही पाकिस्तानचा विजय झाला असा दावाही मुनीर यांनी केला.