न्यूयॉर्क, इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी गुरुवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाइट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रादेशिक सुरक्षा, दहशतवादविरोधी सहकार्य आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन प्रसृत करून या भेटीविषयी माहिती दिली.
“ट्रम्प यांनी जगभरातील संघर्ष संपवण्यासाठी प्रयत्न केले असून ते शांतताप्रिय व्यक्ती आहेत,” असे शरीफ यांनी म्हटले आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी करण्यासाठी त्यांनी धाडसी आणि निर्णयात्मक नेतृत्वाचे दर्शन घडवले अशी प्रशंसाही शरीफ यांनी केली. ट्रम्प यांनी १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधीला मान्यता दिल्याचे ‘ट्रुथ सोशल’वरून जाहीर केले होते.
दोन्ही देशांच्या लष्करी प्रचलनाच्या महासंचालकांदरम्यान (डीजीएमओ) थेट चर्चा होऊन शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला होता, असे भारताने सातत्याने सांगितले आहे. तरीही, ट्रम्प यांनी आापर्यंत जवळपास ५० वेळा, आपण व्यापाराची भीती दाखवून शस्त्रसंधी घडवल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तान आणि अमेरिकेदरम्यान दीर्घकाळापासून भागीदारी राहिली असून यापुढेही हे संबंध परस्परहितासाठी अधिक दृढ होतील, असा विश्वासही शरीफ यांच्या कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आला. पाकिस्तानच्या कृषी, माहिती तंत्रज्ञान, खाण व खनिज आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी शरीफ यांनी अमेरिकी कंपन्यांना आमंत्रित केल्याचेही पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पाकिस्तानविषयक धोरणात बदल शरीफ हे व्हाइट हाऊसला भेट देणारे गेल्या सहा वर्षांतील पहिले पंतप्रधान आहेत. यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी व्हाइट हाऊसमध्ये २०१९मध्ये ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी पाकिस्तानवर अमेरिकेकडून अब्जावधींची मदत मिळवण्यासाठी खोटे बोलल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानवर दहशतवादाला सुरक्षित आश्रय देत असल्याची टीका केली होती.
ट्रम्प यांच्यानंतर अध्यक्ष झालेले जो बायडेन यांनी पाकिस्तानला फारसे महत्त्व न देण्याचे धोरण स्वीकारले होते. मात्र, ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पाकिस्तान-अमेरिका संबंधांमध्ये नाट्यपूर्ण आणि अनपेक्षित बदल झाल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांनी जूनमध्ये जनरल मुनीर यांचा व्हाइट हाऊसमध्ये पाहुणचार केला होता. या प्रकारची भेट दुर्मीळ असल्याचे मानले जाते.