Pakistan PM Shehbaz Sharif trolled for effusive praise of Donald Trump : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहाबाझ शरीफ हे गाझा शांतता शिखर परिषदेत सहभागी झाले होते, येथे त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे इतके कौतुक केले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्वत:ही आश्चर्यचकित झाले. याचे पडसाद सध्या सोशल मीडियावर पडल्याचे पाहायला मिळत आहेत. लोक पाकिस्तानच्या पंतप्रधानांना तुफान ट्रोल करत आहेत.

गाझाच्या भविष्याच्या संदर्शात आयोजित करण्यात आलेल्या या शिखर परिषदेला अचानक कौतुक सोहळ्याचे स्वरूप आले. कारण ट्रम्प यांनी आपलं भाषण चालू असतानाच मध्येच थांबून शाहबाज शरीफ यांना “तुम्हाला काही बोलायचं आहे का? तुम्ही मला त्या दिवशी जे म्हणालात ते सांगा”, अशी विनंती केली. शरीफ देखील तात्काळ पुढे झाले आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मनसोक्त स्तुतिसुमनं उधळली. त्यांनी पुढे पाच मिनिटं केलेल्या भाषणात ट्रम्प यांचे कौतुक केले. यावेळी त्यांचा उल्लेख ‘शांततेचे दूत’ आणि नोबल शांतता पुरस्कारासाठीचे सर्वात विश्वसनीय आणि सर्वात प्रभावी उमेदवार असा केला.

“मी म्हणेन की आजचा दिवस हा सध्याच्या काळातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांनंतर शांतता प्रस्थापित झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे खरोखर शांततेचे दूत आहेत. या जगाला शांतता व समृद्धीच्या वातावरणात राहण्यायोग्य बनवणम्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांत अथक व अविरतपणे काम केलं आहे”, असं शरीफ म्हणाले.

पुढे ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करत शरीफ म्हणाले, “जर हे जंटलमन (डोनाल्ड ट्रम्प) नसते, त्यांनी भारत व पाकिस्तानच्या संघर्षात मध्यस्थी केली नसती, तर युद्ध पुढच्या पातळीवर गेलं असतं. या दोन्ही देशांकडे आण्विक शक्ती आहे. संघर्ष वाढला असता तर काय घडलं असतं हे सांगण्यासाठी कोण जिवंत राहिलं असतं?” असंही शरीफ यावेळी म्हणाले.

ट्र्म्प काय म्हणाले?

या कौतुकाचा ट्रम्प यांनी भरभरून आनंद घेतला, ट्रम्प हसून म्हणाले, “वाह! मला याची अपेक्षा नव्हती. चला घरी जाऊया – आता मला आणखी काही बोलायचे नाहीये.”

या प्रकाराने डोनाल्ड ट्रम्प जरी खुष झाले असले तरी सोशल मीडियावर मात्र लोकांना यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या वागणुकीला ‘शिसारी आणणारे’ आणि ‘लाजिरवाणे’ म्हटले आहे.

इतिहासकार अम्मार अली जान यांनी पोस्ट केली आहे की, “शाहबाज शरीफ यांनी सतात्याने आणि गरज नसताना डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुती जगभरातील पाकिस्तानी लोकांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.”

एक्स वापरकर्ता वसीम याने देखील प्रश्न उपस्थित केला आहे की , “पाकिस्तानी राजकारणी इतके लुच्चे आणि बूट चाटणारे का आहेत? निर्लज्ज माणूस शाहबाज शरीफ… पॅलेस्टिनीयन संघर्षाचा वापर काही ब्राऊनी पॉईंट्स मिळवण्यासाठी करत आहे.”

स्तंभलेखक एसएल कंथन यांनी देखील जहरी टीका केली आहे, “जेव्हा ट्रम्प यांना आपले बूट चमकवून घ्यायचे असतात, तेव्हा ते पाकिस्तानच्या लहानशा पंतप्रधानांना आमंत्रित करतात. भू-राजकारणात इतका लाजिरवाणा (cringe) प्रकार यापूर्वी कधीही पाहिला नव्हता.”

बूट चाटण्यासाठी नोबेल द्या

दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले आहे की जर बूट चाटण्यासाठी जर पुसस्कार असता तर तो शरीफ यांना मिळायला हवा. “मला ट्रम्प यांच्याबद्दल माहिती नाही, पण जर बूट चाटण्यासाठी नोबेल पारितोषिक असते, तर शाहबाज शरीफ त्याचे सर्वात मोठे दावेदार ठरले असते,” असे त्या वापरकर्त्याने पोस्ट केली आहे.

एकंदरीत शरीफ यांनी ट्रम्प यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यात यशस्वी झाले, पण हे करताना त्यांनी पाकिस्तान आणि उर्वरित जगाचेही लक्ष वेधून घेतले आहे.