भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे येत्या चार महिन्यांत आपल्या देशाचा दौरा करतील, अशी अपेक्षा असून येथे त्यांचे स्वागतच होईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. भारतासमवेत पुन्हा व्यापक चर्चा सुरू होईल, अशी आशा पाकिस्तानने व्यक्त केली आहे.
मनमोहन सिंग यांना पाकिस्तानने आमंत्रण दिले असून त्यांनी ते स्वीकारले असल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या तसनीम अस्लम यांनी दिली. या भेटीचा तपशील ठरलेला नाही, परंतु आम्ही त्यांचे निश्चितपणे स्वागत करू, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
नवी दिल्लीत शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनमोहन सिंग यांनी यासंबंधी मत मांडले होते. पंतप्रधानपदाच्या तुमच्या कारकिर्दीत तुम्ही एकदाही पाकिस्तानला भेट दिलेली नाही, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, पाकिस्तानला जाण्यासाठी आपण आशा सोडलेली नाही. पश्चिम पंजाबच्या ज्या एका खेडय़ात आपला जन्म झाला, तो भाग आता पाकिस्तानचा भाग आहे. त्यामुळे आपल्या पंतप्रधानपदाची मुदत संपण्यापूर्वी पाकिस्तानला जायला आपल्याला निश्चित आवडेल. परंतु भरीव स्वरूपाची फलनिष्पत्ती होण्यासाठीची परिस्थिती निर्माण होईल, तेव्हाच तेथे जाणे योग्य ठरेल, असे पंतप्रधान म्हणून आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.