Pakistan targeted golden temple in Amritsar after operation sindoor video : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला होता. यानंतर पाकिस्तानकडून पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान १५ व्या इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) मेजर जनरल कार्तिक सी शेषाद्री यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सोमवारी लष्कराच्या हवाई संरक्षण दलाच्या गनर्सनी सुवर्ण मंदिराला लक्ष्य करत सोडलेले सर्व ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे कशी पाडली याबद्दल खुलासा केला आहे .

मेजर जनरल म्हणाले की, भारतीय लष्कराला आधीच अपेक्षित होते की पाकिस्तान हा लष्करी तळ यासह नागरी वसाहती आणि धार्मिक स्थळे, जसे की सुवर्ण मंदिर यांना लक्ष्य करेल. ते म्हणाले की, “… त्यांच्याकडे लक्ष्य करण्यासाठी रास्त लक्ष्य नाही हे माहिती असल्याने, आम्ही अंदाज बांधला की ते भारतीय लष्कराचे तळ, नागरी वस्त्या यासह धार्मिक स्थळांना लक्ष्य करतील. यापैकी सुवर्ण मंदिर हे सर्वात ठळक लक्ष्य असल्याचे दिसून आले. सुवर्ण मंदिराला संपूर्ण एअर डिफेन्स अम्ब्रेला कव्हर देण्यासाठी आम्ही अतिरिक्त अधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केली.” पुढे त्यांनी असेही सांगितले की, पाकिस्तानकडून ८ मे रोजी मोठ्या प्रमाणात मानवरहित एरियल शस्त्रांनी हवाई हल्ला केला गेला, ज्यामध्ये प्रामुख्याने ड्रोन्स आणि लाँग-रेंज क्षेपणास्त्रांचा समावेश होता.

आम्ही तयारच होतो…

“आम्हाला हे अपेक्षितच असल्याने आम्ही पूर्णपणे तयार होतो आणि आमच्या धाडसी आणि सजग आर्मी एअर डिफेन्स गनर्सनी पाकिस्तानी लष्कराची दुष्ट योजना निष्फळ केली आणि सुवर्ण मंदिराला लक्ष्य करत सोडलेले सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हाणून पाडली. अशा पद्धतीने आपल्या पवित्र सुवर्ण मंदिरावर एकही ओरखडा येऊ दिला नाही,” असेही ते म्हणाले.

आकाश मिसाईल सिस्टम, एल-७० एअर डिफेन्स गन्स यांच्यासह इंडियन एअर डिफेन्स सिस्टमने कशा प्रकारे अमृतसह येथील सुवर्ण मंदिर आणि पंजबमधील शहरांना पाकिस्तानी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांपासून वाचवले याचे प्रात्यक्षिक भारतीय लष्कराने सोमवारी सादर केले.

नऊ ठिकाणी हल्ला

पुढे बोलताना मेजर जनरल यांनी सांगितले की, लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांना अचूकतेने लक्ष्य केले. यामध्ये मुरिदके आणि बहावलपूर येथील घरे आणि दहशतवादी संघटनांची मुख्यालये यांचा समावेश होता. “या (नऊ) लक्ष्यांपैकी लाहोरच्या जवळ असलेल्या मुरिदके येथील लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आणि बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मद (जेईएम) चे मुख्यालय यावर अचूकतेने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर ताबोडतोब एक निवेदन जारी करत आम्ही जाणीवपूर्वक कोणत्याही पाकिस्तानी लष्कर किंवा नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले नाही हे स्पष्ट केले,” असेही ते पुढे म्हणाले.