Pakistan Zindabad Slogan Goa Beach Shops: उत्तर गोव्यातील बीच बेल्टवरील दोन दुकानांच्या एलईडी फलकांवर “पाकिस्तान झिंदाबाद” असे नारे झळकल्या प्रकरणी दोन दुकानांच्या मालकांना पोलिसांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटक केली आहे. याचबरोबर पोलिसांनी बागा येथील ‘रिव्हायव्ह हेअर कटिंग सलून’ आणि अर्पोरा येथील ‘व्हिस्की पीडिया’ येथील एलईडी फलक देखील डिस्कनेक्ट केले आहेत. अटक करण्यात आलेल्यांवर भारताची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणावर बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, “हे फलक परवानगीशिवाय लावण्यात आले होते. पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली आहे.”
“आरोपींनी त्यांच्या दुकानांच्या एलईडी फलकांवर मजकूर स्क्रोल करताना जाणूनबुजून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे घोषवाक्य दाखवले, ज्यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांमध्ये भीती आणि संताप निर्माण झाला. यामुळे भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेविरुद्ध धोका निर्माण झाला. आरोपींनी इंटरनेट/कॉम्प्युटर प्रणालीशी जोडलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे देशद्रोही आणि देशविरोधी संदेश प्रदर्शित करून सामान्य जनतेमध्ये अशांतता आणि संताप निर्माण केला”, असे व्हिस्की पीडियाविरुद्धच्या एफआयआरमध्ये अंजुना पोलिसांनी म्हटले आहे.
कळंगुट पोलिसांनी सांगितले की, रिव्हायव्ह हेअर कटिंग सलूनमधील फलक हा “मानसिक युद्ध आणि राष्ट्राविरुद्ध प्रचार करण्यासारखा प्रकार” होता.
मंगळवारी रात्री उशिरा अर्पोरा येथील स्थानिकांनी व्हिस्की पीडियाच्या एलईडी फलका ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे लिहिलेले दिसल्यानंतर पोलीस ठाण्यात गर्दी केली आणि त्यावर कारवाईची मागणी केली.
अर्पोरा येथील सरपंच रोहन रेडकर म्हणाले की, “दुकानातील कर्मचाऱ्यांना फलक बंद करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी असभ्य वर्तन केले, ज्यामुळे स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला. पोलिस कारवाईनंतर परिस्थिती निवळली.” याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
या प्रकरणात हरियाणातील रंचित भाटिया आणि विपिन पाहुजा, कर्नाटकातील विनय चंद्र राव आणि कृष्णा लमाणी व बिहारमधील मनोज कुमार या व्हिस्की पीडियाच्या मालकांना अटक केली आहे. तर कळंगुट पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मोहम्मद फरमान आणि मोहम्मद शावेज, दिल्लीतील नौशाद कासिम आणि राकेश दास या रिव्हायव्ह हेअर कटिंग सलूनच्या मालकांना अटक केली आहे.
“असे एलईडी फलक चिनी अॅप्स वापरून सहजपणे हॅक केले जाऊ शकतात. सुरुवातीच्या तपासानुसार ते हॅक झाले असण्याची शक्यता आहे. हॅकर्सना शोधणे कठीण काम असेल”, असे एका पोलिस सूत्राने सांगितल्याचे टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.
