Major Moiz Abbas Shah : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडण्याचा दावा करणारा पाकिस्तानी लष्कराचा अधिकारी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. २०१९ मध्ये भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना पकडण्यात सहभागी असलेला पाकिस्तानी लष्कराचा अधिकारी मोईज अब्बास शाह हा पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात तालिबानच्या चकमकीत ठार झाल्याचं वृत्त आहे.

खैबर पख्तूनख्वा भागात तालिबानच्या बरोबर झालेल्या चकमकीत पाकिस्तानी लष्कराचे दोन जवान ठार झाले असून या दोन जवानांपैकी मोईज अब्बास शाह हा एक होता. पाकिस्तानी लष्कराच्या एका निवेदनात या संदर्भातील माहिती देण्यात आली असून या कारवाईत दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ११ टीटीपी दहशतवादी मारल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये मोईज अब्बास शाह याचं नाव समोरं आलं होतं, तेव्हा दावा करण्यात आला होता की भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडणारा तो पाकिस्तानी अधिकारी होता. त्यानंतर मोईज अब्बास कोण आहे? याबाबत चर्चा रंगली होती. दरम्यान, पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी मोईज अब्बासच्या मृत्यूचं वृत्त दिलं असून पाकिस्तानी लष्कराने मोईज अब्बासच्या मृत्यूची मंगळवारी पुष्टी केल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनंदन वर्धमान यांच्या धैर्याचं झालं होतं कौतुक

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला धडकी भरवणारे प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर पाकिस्तानेही हवाई हल्ला करण्याचा अपयशी प्रयत्न केला. तेव्हा पाकिस्तानी विमानांना पळवून लावताना चुकून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या धैर्याचं पाकिस्तानी माध्यमांनी देखील तेव्हा कौतुक केलं होतं.