Pakistani Terrorist Extradited to US: पाकिस्तानकडून दहशतवादाला बळ मिळत असल्याचं भारतानं वारंवार सिद्ध केल्यानंतरदेखील जागतिक स्तरावर पाकिस्तानकडून हे अमान्य केलं जातं. मात्र, वेळोवेळी वेगवेगळ्या दहशतवादी घटनांमधून हे सिद्ध झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या वर्षी अमेरिकेतही अशाच प्रकारचा भीषण दहशतवादी हल्ला एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा कट उधळून लावण्यात कॅनडातील पोलीस यंत्रणेला यश आलं. आयएसआयच्या पाठबळावर अमेरिकेत हा हल्ला घडवून आणण्याचा कट या दहशतवाद्याने रचला होता. मुहम्मद शाहजेब खान असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून तो फक्त २० वर्षांचा आहे. न्यूयॉर्कमध्ये मोठा गोळीबार करण्याचा त्याचा कट होता.

हमासच्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीवेळी होणार होता हल्ला

७ ऑक्टोबर २०२४ रोजी न्यूयॉर्कमधील ज्यू कम्युनिटी सेंटरवर तुफान गोळीबार करण्याचा कट मुहम्मद शाहजेब खान उर्फ शाहजेब जदून यानं रचला होता. हमासनं इस्रायलच्या भूमीत केलेल्या हल्ल्याला याच दिवशी एक वर्ष पूर्ण होणार होतं. त्याचं निमित्त साधून हा हल्ला करण्याचं नियोजन शाहजेबनं केलं होतं. यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचं शाहजेबला पाठबळ होतं. हा सगळा कट नुकताच उघड झाला असून शाहजेबकडून वापरण्यात येणाऱ्या एनक्रिप्टेड मेसेज मोबाईल अॅपच्या माध्यमातून त्याचे तपशील समोर आले आहेत.

यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाला एफबीआय संचालक काश पटेल यांनी माहिती दिली आहे. “शाहजेब खाननं ७ ऑक्टोबर २०२४ रोजी हा हल्ला करण्याची योजना केली होती. कॅनडामध्ये राहणाऱ्या शाहजेब खानला अटक झाली असून त्याला अमेरिकेकडे सोपवण्यात आलं आहे”,असं ते म्हणाले.

एनक्रिप्टेड मेसेजेसचा दहशतवाद्यांकडून वापर

दरम्यान, आपले मेसेज कुणाला कळू नयेत किंवा वाचता येऊ नयेत, यासाठी शाहजेब खान एनक्रिप्टेड मेसेजचं अॅप वापरत होता अशी बाब आता स्पष्ट झाली आहे. २० वर्षीय खानचा बाजारातील एनक्रिप्टेड मेसेजिंग अॅप्सवर विश्वास होता. आपले प्लॅन, इतर साथीदारांशी संभाषण यासाठी खान प्रामुख्याने असे अॅप्स वापरायचा. हे मेसेजेस एनक्रिप्टेड राहात असल्यामुळे कुणी वाचू शकणार नाही, असं त्याला वाटत होतं. पण या कटातील खानचा एक सहकारीच एफबीआयचा अंडर कव्हर एजंट होता. त्यामुळे त्याला पाठवलेल्या एनक्रिप्टेड मेसेजेसमधून खानच्या कटातील महत्त्वाची माहिती तपास यंत्रणांपर्यंत पोहोचली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खाननं या सहकाऱ्याला पाठवलेल्या एका संदेशात अमेरिकेत ९/११ पेक्षाही मोठा हल्ला करण्याची योजना असल्याचं नमूद केलं आहे. “जर आपला प्लॅन यशस्वी झाला, तर अमेरिकेवरचा हा हल्ला ९/११ पेक्षाही मोठा असेल. या हल्ल्यात शक्य तितक्या ज्यू व्यक्तींना ठार करण्याचं लक्ष्य असेल”, असं शाहजेब खान यानं या एनक्रिप्टेड मेसेजमध्ये म्हटलं आहे.