संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याच्या केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाच्या सुरक्षेला अधिक बळकटी आली असून दहशतवादी कारवायांमध्येही लक्षणीय घट झाल्याचे सोमवारी राजनाथ सिंह यांनी येथे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील नेत्यांशी संपर्क साधला. त्याच्या संदर्भाने संरक्षणमंत्री म्हणाले की, तेथील स्थिती दीर्घकाळ कायम अशीच राहावी अशी सरकारची इच्छा नव्हती, असेही लडाखमधील एका कार्यक्रमात संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. सरकारच्या निर्णयामुळे या प्रदेशातील जनतेसाठी आर्थिक-सामाजिक द्वारे खुली झाली, असेही ते म्हणाले.

..तर भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर

भारत शांतताप्रिय देश आहे, भारताने कधीही कोणत्याही प्रकारच्या आक्रमणाचा अवलंब केलेला नाही, मात्र कोणी डिवचले अथवा धमकी दिली तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास भारत सदैव तयार आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी स्पष्ट केले आणि पूर्व लडाखमधून चीनला स्पष्ट संदेश दिला.

संरक्षणमंत्री लडाखच्या दौऱ्यावर आले असून दुसऱ्या दिवशी त्यांनी जवानांना संबोधित केले. शेजारी देशांसमवेत असलेल्या वादावर चर्चेद्वारे तोडगा काढण्याची भारताची इच्छा आहे, मात्र कोणत्याही स्थितीत देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले.

गेल्या वर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले त्यांना संरक्षणमंत्र्यांनी आदरांजली वाहिली आणि त्यांच्या त्यागाचे देशाला कधीही विस्मरण होणार नाही, असे सांगितले. भारत शांतताप्रिय देश आहे, देशाने कोणालाही धमकी दिलेली नाही, मात्र भारताला कोणी धमकी दिल्यास ते सहन केले जाणार नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले. त्यांचे वक्तव्य हा चीनला थेट संदेश असल्याचे मानले जात आहे.