गुजरातच्या मंत्रिमंडळात अपेक्षित खाती न मिळाल्यामुळे नाराज असलेले उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचा पाठिंबा वाढतच चालला आहे. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्यानंतर आता पाटीदार समाजाने त्यांच्या समर्थनार्थ राज्यव्यापी बंद करण्याच इशारा दिला आहे. सरदार पटेल समितीचे समन्वयक लालजी पटेल यांनी १ जानेवारीला मेहसाणा बंदची हाक दिली आहे. यानंतरही नितीन पटेल यांना मुख्यमंत्रीपद दिले नाही तर राज्यव्यापी बंद करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

भाजपने नितीन पटेलांवर नेहमीच अन्याय केला आहे. मी त्यांच्या मेहसाणा येथील समर्थकांना भेटलो. त्यानंतर आम्ही १ जानेवारीला मेहसाणा बंद पुकारण्याचा निर्णय घेतल्याचे लालजी पटेल यांनी सांगितले. आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिला तेव्हा त्यांनाही मुख्यमंत्री पदावर नितीन पटेल यांचीच वर्णी लागावी, असे वाटत होते. मात्र, तसे घडले नाही. तेव्हाही नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास होकार दिला. मात्र, आताच्या घडामोडींनंतर लोकांमध्य राग आहे. नितीन पटेल हेच मुख्यमंत्रिपदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे लालजी पटेल यांनी म्हटले.

तत्पूर्वी या वादाचा राजकीय फायदा घेण्यासाठी पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांने नितीन पटेल यांच्यापुढे मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपमधून बाहेर पडणार असाल तर तुम्हाला काँग्रेसमध्ये योग्य पद आणि सन्मान देण्याची व्यवस्था करण्यात येईल अशी ऑफर हार्दिकने दिली आहे. भाजपामध्ये त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना योग्य सन्मान दिला जात नाही. त्यामुळे सर्व नाराजांनी पक्षाविरोधात बंड करायला हवे. नितीन पटेल आमच्यासोबत येऊ शकतात. भाजपामध्ये त्यांना योग्य सन्मान मिळत नसेल तर त्यांनी पक्ष सोडायला हवा. त्यांनी पक्षासाठी खूप मेहनत केली आहे. जर नितीन पटेल भाजप सोडणार असतील तसेच त्यांच्यासोबत १० समर्थक आमदारही पक्ष सोडणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करतो. मी त्यांच्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करेन आणि त्यांना योग्य पद देण्यास सांगेन, असे हार्दिकने सांगितले.