गुवाहाटी : “आसामचे मुख्यमंत्री स्वतःला राजा समजत असले तरी राज्यातील जनता त्यांना भ्रष्टाचार केल्याबद्दल तुरुंगात पाठवेल,” असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी दिला. छायागाव येथे प्रदेश काँग्रेसची एकदिवसीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांना लक्ष्य केले. आसाममध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होत आहेत.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “सरमा आणि त्यांच्या कुटुंबीयांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जबाबदार धरले जाईल. मुख्यमंत्र्यांना भीती वाटत आहे, त्यांना माहीत आहे की काँग्रेसचे निडर कार्यकर्ते त्यांना तुरुंगात टाकतील.” देशात विचारसरणीची लढाई आहे, संघाचा द्वेष व हिंसा विरुद्ध काँग्रेसचे सत्य आणि अहिंसा अशी ही लढाई आहे, असा दावा राहुल यांनी केला. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही यावेळी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. काँग्रेसमधून पळून गेलेला माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे, असे ते म्हणाले.
निवडणूक आयोग, माध्यमे लक्ष्य
यावेळी राहुल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टीका केली. “निवडणूक आयोग व भाजप एकत्र काम करत आहेत. मतदारयाद्यांचा फेरआढावा घेऊन महाराष्ट्रात फसवणुकीच्या मार्गाने भाजप विजयी झाला. ते हीच युक्ती बिहारमध्ये वापरत आहेत आणि आसाममध्येही वापरतील. आपण खबरदार राहायला हवे,” असे ते म्हणाले. तसेच माध्यमे काँग्रेसच्या विरोधात काम करत असल्याचाही आरोप राहुल यांनी केला.
काँग्रेस नेता राहुल गांधी स्वतःच त्यांच्याविरोधात देशभर दाखल करण्यात आलेल्या अनेक खटल्यांमध्ये जामिनावर बाहेर आहेत. हे ते सोयीस्करपणे विसरले आहेत. आसामच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकू, हे सांगायला ते इथपर्यंत आले. – हिमांता बिस्वा सरमा, मुख्यमंत्री, आसाम