जगभरातील सर्व धर्मियांच्या तुलनेत हिंदू लोकांचे शिक्षण हे तुलनेने कमी असल्याचा अहवाल प्रतिष्ठित अशा प्यू संशोधन संस्थेनी दिला आहे. गेल्या काही दशकात हिंदूंनी शिक्षणात चांगली प्रगती साधली आहे याचे निरीक्षण देखील नोंदविण्यात आले आहे. मागील पिढीचा विचार करता नवी पिढीला शिक्षणाच्या संधी जास्त उपलब्ध असल्याचे अहवालात म्हटले आहे.

शैक्षणिक स्थितीचा अंदाज घेण्यासाठी एक व्यक्ती आपल्या आयुष्यातील किती वर्षे शिक्षणाला समर्पित करते यावरुन हा अभ्यास करण्यात आला आहे. त्या धर्मातील लोकांच्या शैक्षणिक वर्षाची सरासरी काढण्यात आलेली आहे. त्या आधारावर हे निष्कर्ष देण्यात आले आहे. नवीन पिढी मागील पिढीच्या तुलनेत सरासरी ३.४ वर्षे जास्त शिक्षण घेतलेली आहे.

सर्व धर्मियांच्या तुलनेत ज्यू हे सर्वाधिक शिकलेले असल्याचे प्यू च्या अहवालात म्हटले आहे. हिंदू व्यक्ती सरासरी आपल्या आयुष्यात केवळ ५.६ वर्षे शिक्षण घेते तर ४१ टक्के हिंदूंकडे कुठलेही औपचारिक शिक्षण नसल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. केवळ १ टक्का व्यक्ती या कनिष्ट महाविद्यालय उत्तीर्ण असतात असे या अहवालात म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये हिंदू महिलांची शिक्षणाची स्थिती सुधारली असली तरी महिला आणि पुरुषांच्या शिक्षणात खूप मोठा फरक असल्याचे जगभरातील धर्म आणि शिक्षणाची स्थिती या अहवालात प्यू संशोधन म्हटले आहे. १६० पानांच्या या अहवालात प्यू ने म्हटले आहे की मुस्लीम, हिंदू, ख्रिश्चन या सर्वांच्या तुलने ज्यू यांनी जास्त शैक्षणिक प्रगती साधली आहे.

जगभरातील १५१ देशांमधून डाटा गोळा करण्यात आलेला आहे. त्यानुसार हा अभ्यास करण्यात आला आहे. जगभरातील स्त्री-पुरुषांच्या शिक्षणात खूप मोठा फरक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. जसं की, जगभरातील मुस्लीम महिला या आपल्या आयुष्यातील सरासरी ४.९ वर्षे शिक्षणावर देतात तर मुस्लीम पुरुषांचे हेच प्रमाण ६.४ वर्षे इतके आहे.

हिंदू पुरुष सरासरी आपल्या आयुष्यातील ६.९ वर्षे इतका काळ औपचारिक शिक्षणासाठी देतात तर हिंदू महिलांमध्ये हेच प्रमाण ४.२ वर्षे इतके आहे. याचाच अर्थ एक पुरुष औपचारिक शिक्षणावर हिंदू महिलेच्या तुलनेत २.७ वर्षे अधिक शिक्षण घेतो. जगभरातील ५३ टक्के हिंदू महिलांना औपचारिक शिक्षणाची संधी मिळत नाही. तर, जगभरातील २९ टक्के हिंदू पुरूष हे औपचारिक शिक्षणापासून वंचित राहतात.

नवी पिढीचा जरी विचार केला तर ३८ टक्के मुली या शिक्षणापासून वंचित राहत आहेत तर २० टक्के मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. जगभरातील बहुसंख्य हिंदू हे भारतात राहतात. जगाच्या तुलनेत सुमारे ९४ टक्के हिंदू हे भारतात राहतात. नेपाळमध्ये २.३ टक्के आणि बांग्लादेशात १.२ राहतात.

नेपाळ आणि बांग्लादेशमधील हिंदूंच्या तुलनेत भारतीय हिंदूंची शैक्षणिक स्थिती चांगली आहे. भारतीय हिंदू त्याच्या आयुष्यातील ५.५ वर्षे शिक्षणासाठी देतो तर नेपाळमध्ये हे प्रमाण ३.९ वर्षे आहे आणि बांग्लादेशमध्ये हे प्रमाण ४.६ वर्षे आहे. आशिया प्रशांत भागात राहणारे, युरोप आणि अमेरिकेमध्ये राहणारे हिंदू शैक्षणिकबाबतीत पुढारलेले आहेत.
अमेरिकेतील हिंदू सरासरी आपल्या आयुष्यातील १५.७ वर्षे शिक्षणाला देतात. तर युरोपमध्ये असणारे हिंदू हे सरासरी आपल्या आयुष्यातील १३.९ वर्षे शिक्षणासाठी देतात.