पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran khan) यांनी गुरुवारी देशाला संबोधित करताना विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. त्यांनी आपल्या विरोधी पक्षांवर टीका करताना विरोधी पक्षांनी लोकशाहीचा अपमान केल्याचा आरोप केलाय. इम्रान खान यांनी सीनेट निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचे उमेदवार असणाऱ्या यूसूफ रजा गिलानी यांनी मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केल्याचा आरोपही केला आहे. देशाचे अर्थमंत्री अब्दुल हफीज शेख यांचा पराभव झाल्याने शनिवारी इम्रान खान हे संसदेमध्ये बुहमत सादर करणार आहेत. यावेळी इम्रान खान यांनी मी भ्रष्टाचाराला पाठिंबा देण्याऐवजी विरोधी पक्षात बसेल असंही आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केलं आहे.

“यांचा असा विचार आहे की माझ्या डोक्यावर अविश्वास ठरावाची टांगती तलवार लटकवायची. त्यामुळे दबावाखाली मी त्यांच्याविरोधातील सर्व खटले मागे घेईल. मी स्वत:च आता बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. मी संसदेमध्ये सर्वांसमोर हा विश्वास ठराव मांडणार आहे. मी माझ्या पक्षाच्या लोकांना सांगू इच्छितो की जर तुम्ही माझ्यासोबत नसाल तर तो निर्णय तुमचा हक्क आहे. विश्वासदर्शक ठरावादरम्यान हात उंचावून सांगा. मी विरोधी पक्षात जाऊन बसायला तयार आहे,” असं भावनिक आवाहनही इम्रान यांनी केलं आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी जर मी या भ्रष्ट लोकांसमोर हरलो तरी सत्ता गेल्यानंतर मला काय विशेष फरक पडणार आहे, अशा पद्धतीचं वक्तव्यही इम्रान यांनी केलं.

“मी देशाच्या संसदेमध्ये बहुमत सिद्ध करणार आहे. मी विरोधी पक्षात असो किंवा संसदेच्या बाहेर असो मी तुम्हाला (विरोधी पक्षाच्या नेत्यांना) तोपर्यंत नाही सोडणार जोपर्यंत तुम्ही या देशाचे पैसे परत नाहीत. सत्ता गेल्याने माझ्या आयुष्यावर काही विशेष फरक पडणार नाही. मी जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत माझ्या देशासाठी या लोकांशी लढत राहणार आहे,” अशी भावनिक साद इम्रान यांनी देशवासियांना घातली.

तसेच इम्रान यांनी आपण राजकारणामध्ये पैसे कमावण्यासाठी आलेलो नाही असं म्हटलं आहे. माझ्याकडे आधीपासूनच एवढा पैसा आणि प्रसिद्धी आहे की मी माझं संपूर्ण आयुष्य त्यावर काढलं असतं. मात्र मी देशाच्या भल्यासाठी राजकारणामध्ये येण्याचा निर्णय़ घेतला. मी कोणत्याही किंमतीवर भ्रष्टाचार करणाऱ्यांशी तडजोड करणार नाही, असंही इम्रान यांनी म्हटलं आहे.