महाड येथील काजळपुरामध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या सर्वांना तातडीने मदत करण्याचे काम सुरु असल्याचेही पंतप्रधांनी म्हटलं आहे.

“महाराष्ट्रातील रायगडमधील महाड येथील इमारत दुर्घटनेमुळे दु:ख झालं आहे. माझ्या सद्भभावना जवळच्या व्यक्ती गामवलेल्यांबरोबर आहेत. जखमींना लवकर बरं वाटो अशी प्रार्थना करतो. दुर्घटनेच्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या टीम आणि एनडीआरएफच्या टीम मदतकार्य करत आहेत,” असं मोदींनी म्हटल्याचं ट्विट पंतप्रधान कार्यालयाच्या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.

काजळपुरा परिसरातील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जखमींवर महाड  येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाच वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यात ४५ कुटुंबे राहात होती. दुपारनंतर इमारत खचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे २५ कुटुंबांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. संध्याकाळी सातच्या सुमारास इमारत कोसळली. इमारतीचे वरचे तीन मजले पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

दुर्घटनेनंतर नगरपालिका, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या साह्यने मदतकार्य सुरू करण्यात आले. इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्यांवर महाड येथील ट्रॉमाकेअर सेंटर आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन तुकडय़ा तात्काळ पुण्याहून रात्री एकच्या सुमारात घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनाही मदतकार्य सुरु केलं आहे. दुर्घटनेनंतर माणगाव, रोहा, अलिबाग येथून डॉक्टरांची पथके आणि रुग्णवाहिका महाडला रवाना झाल्या. घटनास्थळावर पाच डॉक्टरांचे पथक तैनात ठेवण्यात आले आहे. जखमींना रक्ताची गरज लागण्याची शक्यता लक्षात घेऊन पुरेसा रक्तसाठा महाड, माणगाव रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध भागांतून रुग्णवाहिका महाडला पाठविण्यात आल्या आहेत.

साधारणपणे पाच वर्षांपूर्वी तळोजा येथील पटेल आणि युनूस शेख या बांधकाम व्यावयायिकांनी या पाच मजली इमारतीचे बांधकाम केले होते. गेल्या काही महिन्यांपासून इमारतीला तडे जात असल्याची तक्रार रहिवाशांनी विकासकाकडे केली होती. मात्र, या तक्रारींकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. इमारत दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार भरत गोगावले आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी चर्चा केली. जलदगतीने बचावकार्य आणि मदतकार्यासाठी सरकारतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.