“लसीकरण केंद्रावरील रांगेत उभं राहून जाणून घ्या लोकांना काय समस्या येतायत”; मोदींची मंत्र्यांना सूचना

करोनाच्या कालावधीमध्ये हाती घेतलेले प्रकल्प रखडणार नाही याची काळजी घेण्याचंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सहकाऱ्यांना केलंय

vaccination line
पंतप्रधान मोदींनी बुधवारी आढावा बैठकीमध्ये आपले विचार मांडले. (प्रातिनिधिक फोटो)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी सायंकाळी मंत्रीमंडळाची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीमध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील शंका आणि प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी करोना प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये आरोग्य मंत्रालय, नागरिक हवाई उड्डाण मंत्रालय, रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी करोना लसीकरणासंदर्भात सर्वच मंत्र्यांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं. तसेच करोनाच्या कालावधीमध्ये हाती घेतलेले प्रकल्प रखडणार नाही याची काळजी घेण्याचंही आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षात लसीकरण केंद्रावर जाणून परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी आपल्या सहकऱ्यांना केल्यात.

पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये करोना परिस्थितीचा आढावा घेताना करोनासंदर्भातील नियमांचे कटाक्षाने पालन करावे असे सांगितले. तसेच मंत्र्यांनी स्वत: मास्क लावण्याबरोबरच लोकांनाही मास्क लावण्याचं महत्व पटवून द्यावं. करोना संपलाय असं कोणीही समजू नये. तिसरी लाट येणारच नाही अशापद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे, असंही मोदी यावेळी मंत्र्यांशी बोलताना म्हणाले.

नक्की वाचा >> “पंतप्रधान मोदीजी २०२४ मध्ये क्लीन बोल्ड होतील”; अभिनेत्याचं ट्विट चर्चेत

पंतप्रधानांनी सर्व नेत्यांना लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करुन घ्यावं यासाठी सर्व नेत्यांनी आजपासूनच कामाला सुरुवात करण्याची गरज असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं. पंतप्रधानांनी आपल्या सहकाऱ्यांना थेट लसीकरण केंद्रावरील रांगांमध्ये उभं राहून परिस्थितीची चाचपणी करण्याचाही सल्ला दिला. लसीकरण केंद्रावरील रांगांमध्ये उभं राहून जाणून घ्या की लोकांना नक्की काय अडचणींचा समाना करावा लागतोय, असं मोदी म्हणाल्याचं वृत्त आजतकने दिलं आहे. सरकारच्या योजनांचा अगदी तळागाळातील व्यक्तींना फायदा व्हावा यासाठी काम करा, असं आवाहनही मोदींनी केलं.

नक्की वाचा >> इयर एण्डला मोदींचा अमेरिका दौरा?; पहिल्यांदाच बायडन यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून भेट घेण्याची शक्यता

पंतप्रधानांनी करोनामुळे वेगवेगळ्या मतदारासंघांमध्ये सुरु झालेल्या प्रकल्पांची कामं थांबता कामा नये अशी सूचनाही मंत्र्यांना केली. ज्या ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन किंवा बांधकामाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला तुम्ही हजेरी लावली त्या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळाही तुमच्याच हस्ते पार पडला पाहिजे अशा वेगाने काम करा, असा सल्ला मोदींनी दिली. सर्व प्रकल्पांच्या कामांवर लक्ष ठेवा आणि हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी उशीर होत नाहीय ना याची काळजी घ्या.

नक्की वाचा >> हे १०० रुपये घ्या आणि दाढी कटींग करुन या; महाराष्ट्रातील चहावाल्याची मोदींना मनी ऑर्डर

७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर काय करता येईल यासंदर्भातील सल्लाही मोदींनी आपल्या सहकाऱ्यांकडे मागीतला. बुधवारी रात्री उशीरापर्यंत ही आढावा बैठक सुरु होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm modi meeting with union council of ministers cabinet scsg