पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसीय रशिया दौऱ्याला आजपासून सुरूवात झाली आहे.  रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी पंतप्रधान मोदींचे व्लादिवोस्तोक विमानतळावर आगमन  झाल्यानंतर गळाभेट घेऊन स्वागत केले. यानंतर हे दोन्ही नेते एकाच बोटीद्वारे व्लादिवोस्तोकमधील  शीप बिल्डिंग कॉम्प्लेक्सकडे रवाना झाले. तसेच, पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबरोबर प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा देखील केली.

यावेळी पंतप्रधान मोदींनी, ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी आपण मला दिलेले आमंत्रण ही सन्मानाची बाब आहे. दोन्ही देशांमधील सहकार्याच्या भावनेला नवा आयाम मिळवून देण्याचा हा ऐतिहासिक प्रसंग असल्याचे म्हणत,  मी उद्याच्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्याची वाट पाहत असल्याचे सांगितले.

पंतप्रधान मोदींनी हे देखील म्हटले की, रशियातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन तुम्ही माझा गौरव करणार असल्याची घोषणा केली आहे. मी तुमचे व रशियातील जनतेचे यासाठी आभार मानतो. हे आपल्या दोन्ही देशांमधील जनतेच्या मैत्रीपूर्ण संबधांचे प्रतीक आहे व १३० कोटी भारतीयांसाठी ही सन्मानाची बाब असल्याचेही पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले.

रशिया हा भारताचा समविचारी  विश्वासू भागीदार आहे. तुम्ही आमच्या विशेष आणि विशेषाधिकारात्मक रणनीतिक भागीदारी वाढवण्यावर वैयक्तिकरित्या लक्ष केंद्रीत केले आहे. दोन समविचारी  म्हणून आपण नियमीतपणे भेटलो. मी तुमच्या अनेक मुद्यांवर फोनवर बोललो आहे आणि यात मला कधीच संकोच वाटला नाही, असेही मोदींनी यावेळी नमूद केले.

तत्पूर्वी पंतप्रधान मोदींचे आज सकाळी रशियातील व्लादिवोस्तोक येथे आगमन झाल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेत भेटीचा आनंद व्यक्त केला.

यानंतर हे दोन्ही नेते एकाच बोटीद्वारे शीप बिल्डिंग कॉम्प्लेक्सकडे रवाना झाले होते. पंतप्रधान मोदींना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पाचव्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.

पंतप्रधान मोदी भारत आणि रशिया दरम्यान होणाऱ्या २० व्या वार्षिक शिखर संमेलनात सहभागी होतील. शिखर संमेलनानंतर दोन अशा घोषणा होणार केल्या जाण्याची शक्यता आहे, ज्या भारत आणि रशियाचा संबंधांना नवी दिशा देतील. ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमला रशियाने २०१५ मध्ये सुरू केले होते यात माजी उद्योग मंत्री २०१८ मध्ये सहभागी झाले होते. तर माजी परराष्ट्रमंत्री २०१७ मध्ये सहभागी झाले होते.