Mallikarjun Kharge On Narendra Modi : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकातील म्हैसूरमधील एका कार्यक्रमात बोलताना शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. “पंतप्रधान मोदींनी ४२ देशांना भेट दिली, पण मणिपूरमध्ये भेट देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही”, अशा शब्दांत मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की, “ईशान्येकडील राज्य गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळ जातीय अशांततेचे साक्षीदार आहेत. विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या या राज्यांच्या हाताळणीवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. तसेच या देशातील जनता भारतीय जनता पक्षाला आणि आरएसएसला कधीही संविधान बदलू देणार नाही”, अशा शब्दांत खरगे यांनी जोरदार टीका केली. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षामधील तफावत दाखवत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “काँग्रेस पक्षात लोक कामगिरी करतात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या भारतीय जनता पक्षात लोक फक्त बोलतात”, असंही ते म्हणाले. दरम्यान, यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटक सरकारबाबतही भाष्य केल्याचं पाहायला मिळालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक सरकारबाबत उलटसूलट चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या चर्चांवर पक्षाच्या हायकमांडने स्पष्टीकरण देत कर्नाटक सरकारमध्ये कोणतीही उलथापालथ होणार नसल्याचं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, आता मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसशासित राज्याच्या भूमिकेचं यावेळी समर्थन केलं. तसेच खरगे म्हमाले की, “कर्नाटक सरकार आरोपांप्रमाणे दिवाळखोर नाही असं म्हणत कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला मल्लिकार्जुन खरगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.