पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए आणि इतर काही तपास यंत्रणांना आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्याकडे २० आरडीएक्स असून देशातल्या महत्त्वाच्या २० शहरांमध्ये मोठे ब्लास्ट करणार असल्याचं या इमेलमध्ये म्हटलं आहे. त्यानुसार एनआयएनं तपास सुरू केला असून इमेल नेमका कुणी पाठवला आहे, याविषयी शोध सुरू करण्यात आला आहे.

शुक्रवारी उघड झाला प्रकार!

हा इमेल एनआयए मुंबईला महिन्याभरापूर्वीच आला असल्याची माहिती मिळाली आहे. हा इमेल इतर तपास यंत्रणांना देखील पाठवण्यात आल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पोलिसांचा देखील समावेश आहे. शुक्रवारी असा इमेल आल्याचं वृत्त व्हायरल झाल्यानंतर एनआयएनं त्याला दुजोरा दिला आहे.

काय लिहिलंय इमेलमध्ये?

या इमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “माझ्याकडे २० पेक्षा जास्त आरडीएक्स आहे. मी २० मोठे हल्ले करण्याची योजना आखली असून सर्व आरडीएक्स मोठ्या शहरांमध्ये प्लांट करण्यात आलं आहे. मला शक्य तितक्या लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार मारायचं आह. मी त्यांच्यावर बॉम्बचा वर्षाव करेन. त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. मी कुणालाही सोडणार नाही. मी २ कोटीहून जास्त लोकांना मारणार आहे”, असं या मेलमध्ये म्हटलं आहे.

धोका नाही?

दरम्यान, अशा प्रकारची पत्र किंवा इमेल अनेकदा येत असतात आणि ते पाठवणाऱ्याचा त्यात लिहिलेल्या गोष्टी करण्याचा हेतू नसतो असं एनआयएच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जर केंद्रीय तपास यंत्रणांना हा गंभीर धोका वाटला असता, तर त्यांनी यासंदर्भात खूप आधीच माहिती दिली असती, तातडीने कारवाई केली असती. आम्हाला महिन्याला किमान एक अशा प्रकारचं पत्र किंवा इमेल मिळत असतं. पण तरी देखील आम्ही त्याकडे दुर्लक्ष न करता हा इमेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहोत”, असं या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.