नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला लष्करी कारवाईद्वारे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी हिरवा कंदिल दाखविला. संरक्षणविषयक उच्चस्तरीय बैठकीमध्ये दहशतवाद चिरडून टाकण्यासाठी कधी, कुठे आणि केव्हा लष्करी कारवाई करायची, याचे संपूर्ण स्वातंत्र्य संरक्षण दलांना असेल, असा स्पष्ट व थेट संदेश मोदींनी दिल्याचे समजते.

दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचे पुरावे असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान निवासस्थानी सुमारे दीड तास संरक्षणविषयक उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सैन्यदलप्रमुख अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते. या वेळी पंतप्रधानांनी दिलेल्या संदेशामुळे पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई केली जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

उरी व पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्ष्यभेदी हल्ला व हवाई हल्ला करून भारताने चोख प्रत्युत्तर दिले होते. या वेळीही अधिक तीव्र लष्करी स्वरूपाची कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पंतप्रधानांची तातडीने भेट घेतली, हे विशेष. केंद्रीय संरक्षणविषयक समितीचीही (सीसीडी) आज, बुधवारी दुसरी बैठक होणार आहे. यामध्ये मोदींसह अमित शहा, राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश आहे.

या बैठकीनंतर पहलगाम हल्ल्यानंतर प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळाचीही बैठक होईल. या वेळी संभाव्य लष्करी कारवायांबाबत धोरणांवर शिक्कामोर्तब केले जाईल, असे मानले जात आहे. बुधवारीच केंद्रीय राजकीय व आर्थिक समित्यांच्याही बैठका होणार आहेत. केंद्राच्या राजकीय समितीमध्ये उपरोक्त पाच मंत्र्यांसह केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आदी मंत्र्यांचा समावेश आहे. सैन्यदलांची तयारी, देशातील राजकीय परिस्थिती व आर्थिक ताकद या तीनही मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केल्यानंतर धोरण निश्चित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरसंघचालकांची पंतप्रधानांशी चर्चा

नवी दिल्ली: सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे. पंतप्रधानांनी तिन्ही सेनादलाचे प्रमुख, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही भेट झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पंतप्रधानांशी संवाद साधला. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादविरोधी उपाययोजनांबाबत शहा बैठका घेत आहेत.

मंत्र्याकडूनच पाकिस्तानचे कपट उघड

संयुक्त राष्ट्रे : दहशतवादाला खतपाणी घालण्याचा आपल्या देशाचा इतिहास पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी स्वत:च उघड केल्याचे सांगत भारताने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर पाकिस्तानचे कपट चव्हाट्यावर आणले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृतांच्या वारसांना ५० लाखांची मदतमुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील नागरिकांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत केली. कुटुंबात अन्य उत्पन्नाचे साधन नसल्यास एका वारसाला शासकीय नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.