PM Modi Lex Fridman Podcast : अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा पॉडकास्ट आज प्रसारित झाला आहे. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास तीन तास संवाद साधला. या संपूर्ण मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जीवनातील प्रवासासह देशातील विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच भारत-चीन, भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध सुधारण्यावरही भाष्य केलं.

तसेच मोदी आरएसएसमध्ये कसे सामील झाले, त्यांच्या जीवनात आरएसएसचा काय प्रभाव पडला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत दिले आहेत. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींना गुजरातच्या २००२ मधील दंगल प्रकरणावरही प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी मोदींनी मौन सोडत गुजरात दंगल प्रकरणावरही भाष्य केलं. तसेच जे त्या प्रकरणात दोषी होते, त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

२००२ च्या गुजरात दंगलींकडे मोदी कसे पाहतात? असं विचारलं असता मोदी म्हणाले की, “२००२ च्या दंगली भोवतीच्या चर्चेला खोटी कहाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. २००२ पूर्वी गुजरातमध्ये २५० हून अधिक दंगली झाल्या होत्या आणि जातीय हिंसाचार वारंवार होत होता. २००२ पूर्वी देशात सतत दहशतवादी हल्ले आणि अस्थिरतेचे वातावरण होते, त्यामुळे तणाव शिगेला पोहोचला होता. तेव्हा जगातही दहशतवादी कारवायांमध्येही वाढ दिसून आली होती. १९९९ मध्ये कंधार अपहरण प्रकरण झालं होतं, २००० मध्ये लाल किल्ल्यावर हल्ला झाला होता आणि २००१ मध्ये आपल्या संसदेवर हल्ला झाला होता. तो काळ मोठ्या आव्हानांचा होता. पण २००२ नंतर गुजरातमध्ये एकही मोठी दंगल घडलेली नाही. आता राज्यात कायमस्वरूपी शांतता आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

“२००२ ची आतापर्यंतची मोठी दंगली होती ही धारणा चुकीची आहे. वास्तविकता अशी आहे की २००२ पूर्वी गुजरातमध्ये जातीय दंगली झाल्या होत्या. तरीही २००२ प्रमाणे त्या कधीही आंतरराष्ट्रीय बातम्या बनल्या नाहीत. तेव्हा आमच्या सरकारने स्थिरता आणण्याचे प्रयत्न केले. पण तरीही राजकीय विरोधक आणि माध्यमांच्या काही विशिष्ट गटांनी आमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खोटेपणा पसरवण्याचा प्रयत्न झाला. पण शेवटी न्यायाचा विजय झाला आणि न्यायालयांनी माझे नाव निर्दोष ठरवले”, असं मोदींनी म्हटलं आहे.

तुम्ही टीकेकडे कसे पाहता?

“टीका ही लोकशाहीचा आत्मा आहे. आपले धर्मग्रंथ म्हणतात की, तुमच्या टीकाकारांना नेहमी जवळ ठेवा. कारण ते तुम्हाला सुधारण्यास मदत करतात. खरी टीका ही संशोधन आणि विश्लेषणावर आधारित असते. दुर्दैवाने आजचे माध्यमे आणि राजकीय विरोधक अनेकदा शॉर्टकट घेतात. विचारपूर्वक टीका करण्याऐवजी निराधार आरोप करतात. पण आता तुम्ही जे संदर्भ देत आहात, ते आरोप आहेत, टीका नाही”, असंही मोदी यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्यांनी दंगलीबद्दल माझ्यावर टीका केली, त्यांना २००२ पूर्वीच्या गुजरातच्या हिंसाचाराच्या इतिहासाची पर्वा नव्हती. त्यानंतर झालेल्या परिवर्तनात त्यांना रस नव्हता. त्यांना फक्त त्यांच्या अजेंड्याला अनुकूल अशी कथा तयार करायची होती. खरं तर अनेक दशकांपासून राजकारणात मतांसाठी काही गटांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला जायचा, पण आम्ही हे पूर्णपणे बदललं. आम्ही महत्त्वाकांक्षी राजकारणावर लक्ष केंद्रित केलं”, असंही मोदी यावेळी म्हणाले.