इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्ष शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्याचा विचार करत आहे. पुढील महिन्यात हा शपथविधी पार पडणार आहे. शपथविधीसाठी सार्क देशांच्या सर्व नेत्यांना निमंत्रण देण्यात येणार असून यामध्ये नरेंद्र मोदींच्या नावाचाही समावेश आहे.

नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. मात्र सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे बहुमत नाही आहे. दरम्यान इम्रान खान यांनी ११ ऑगस्ट रोजी आपण पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.

‘तेहरीक-ए-इन्साफची कोअर कमिटी सार्क देशाच्या प्रमुखांना निमंत्रण देण्याचा विचार करत असून यामध्ये नरेंद्र मोदींचाही समावेश आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून लवकरच तो घेतला जाईल’, अशी माहिती पक्षातील एका नेत्याने पीटीआयशी बोलताना दिली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन इम्रान खान यांचं अभिनंदन करणं दोन्ही देशातील संबंध सुधारण्यास मदत करेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झालेले इम्रान खान यांच्याशी सोमवारी फोनवरुन संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी इम्रान खान यांचे सार्वत्रिक निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आल्याबद्दल अभिनंदन केलं. तसंच यावेळी त्यांनी शांती आणि विकासावर चर्चा केली. पाकिस्तानमध्ये लोकशाही घट्ट रुजेल होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाने सर्वाधिक जागा मिळविल्या असल्या तरी हा पक्ष बहुमतापासून अद्यापि दूर आहे. इम्रान खान यांनी पाच जागांवर निवडणूक लढविली आणि ते निवडूनही आले आहेत. त्यामुळे त्यांना चार जागा सोडाव्या लागणार असल्याने त्यांच्या पक्षाच्या अडचणींमध्ये भरच पडणार आहे.

पक्षाला पूर्ण बहुमत नसल्याने लहान पक्षांच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार स्थापन होणार असून अपक्ष व लहान पक्ष यांच्याशी वाटाघाटी सुरू आहेत. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ हा नॅशनल असेंब्लीत सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांना ११६ जागा मिळाल्या आहेत. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे नेते नइनउल हक यांनी सांगितले की, बहुमत मिळवण्यासाठी अपक्ष व लहान पक्ष यांच्याशी वाटाघाटी सुरू आहेत.

पाकिस्तान निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाला ११६ जागा मिळाल्या असून बहुमतासाठी १२ जागा कमी पडल्या आहेत. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाला ६४ तर पाकिस्तान पीपल्स पार्टीला ४३ जागा मिळाल्या आहेत. पाकिस्तान नॅशनल असेंब्लीत एकूण ३४२ जागा असून त्यात २७२ जागांची थेट निवडणूक होते. बहुमतासाठी १७२ जागा मिळवणे आवश्यक असते. पाकिस्तानात राजकीय घडामोडींना निकालानंतर वेग आला असून काही खुल्या तर काही गुप्त बैठका सुरू आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टी व पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ यांच्या बैठका दोन दिवसात होण्याची शक्यता असून त्यात संसदेत पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाला घेरण्याची रणनीती निश्चित केली जाईल.