लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. यानंतर सातव्या टप्प्यातील मतदान होणार असून ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सध्या सातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपाच्या फैरी झडत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब येथील एका प्राचाराच्या सभेत बोलताना आम आदमी पार्टी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. ‘आम आदमी पार्टीचे नेते दिल्लीत बसून पंजाबवर नियंत्रण ठेवत आहेत’ अशी खोचक टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील गुरुदासपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, “दिल्लीचे ‘दरबारी’ पंजाबवर राज्य करत आहेत. पंजाब सरकारवर आम आदमी पार्टीच्या प्रमुख नेत्यांचे नियंत्रण आहे. या राज्याचे मुख्यमंत्री स्वतःचा एकही निर्णय घेऊ शकत नाहीत. पंजाबच्या कारभाराचा रिमोट कंट्रोल केला आहे. दिल्लीचे दरबारी पंजाबवर राज्य करत आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांना त्यांचं सरकार चालवण्यासाठी आणि नवीन आदेश घेण्यासाठी तिहार तुरुंगात जावं लागतं”, अशी खोचक टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

हेही वाचा : मतदानाबद्दलच्या प्रक्रियेत हस्तक्षेपास नकार; माहिती ४८ तासांत जाहीर करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित

“पंजाबमध्ये जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा काँग्रेसलाही रिमोट कंट्रोलद्वारे पंजाबचे सरकार चालवायचे होते. मात्र, तसे करण्यास माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नकार दिला. दिल्लीच्या राजकुमारांच्या (राहुल गांधी) आदेशाचे पालन करण्यासाठी त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवले. त्यामुळे पंजाबचा हा अपमान कोणी कधी विसरू शकेल का?”, असा सवाल करत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“इंडिया आघाडीचा सर्वाधिक फटका पंजाबला बसला आहे. फाळणी, अस्थिरता, अतिरेकी, पंजाबच्या बंधुत्वावर हल्ला आणि त्याच्या श्रद्धेवर हल्ला. पंजाबमध्ये फुटीरतावादाला खतपाणी अशा अनेक गोष्टी आहेत. जोपर्यंत काँग्रेसचं केंद्रात सरकार होतं तोपर्यंत दंगलखोरांना त्यांनी आश्रय दिला. मात्र आम्ही २९८४ च्या खटल्याच्या फायली पुन्हा उघडल्या आणि आरोपींना शिक्षा सुनिश्चित केली. आम आदमी पार्टी ही काँग्रेसची फोटो कॉपी पार्टी आहे. जे मीडिया हाऊस त्यांच्याकडे झुकत नाहीत, त्यांच्यावर ते गुन्हे दाखल करत आहेत. हे त्यांचं वास्तव आहे. मात्र, मी आमच्या प्रदेशाध्यक्षांचं अभिनंदन करतो, त्यांनी पुढाकार घेतला आणि त्याविरोधात लढा सुरू केला”, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर केला.