Croatia Welcomes PM Modi With Gayatri Mantra: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा क्रोएशिया दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यानिमित्त क्रोएशियाची राजधानी झाग्रेबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. या देशाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. दरम्यान, झाग्रेबमधील हॉटेलमध्ये पोहोचताच, तेथील भारतीय नागरिकांनी पंतप्रधानांचे “वंदे मातरम” आणि “भारत माता की जय” च्या जयघोषाने स्वागत केले, तसेच पारंपरिक भारतीय नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रमदेखील सादर केला.
यावेळी पांढऱ्या पोशाखातील क्रोएशियन नागरिकांच्या एका पथकाने पंतप्रधान मोदींसोबत ‘गायत्री मंत्र’ आणि इतर संस्कृत श्लोकांचे पठन केले. यावरून भारत आणि क्रोएशियामधील भक्कम सांस्कृतिक संबंध अधोरेखित झाले. या क्षणाचा व्हिडिओ पंतप्रधानांच्या अधिकृत एक्स हँडलवरून शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून, त्यावर मोठ्या संख्येने प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर त्यांच्या क्रोएशियातील स्वागताचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले की, “संस्कृतीचे बंध भक्कम आणि उत्साही आहेत! झाग्रेबमधील स्वागताचा हा एक क्षण आहे. क्रोएशियामध्ये भारतीय संस्कृतीचा इतका आदर होत असल्याचे पाहून आनंद झाला.”
दुसऱ्या एका पोस्टमध्ये, पंतप्रधान मोदींनी झाग्रेबमधील त्यांच्या स्वागताचे ठळक मुद्दे टिपणारा दोन मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
कुठे आहे क्रोएशिया देश?
क्रोएशिया हा युरोपमधील एक छोटासा देश आहे. जगभरातील असंख्य लोकांचे क्रोएशिया आवडते पर्यटन स्थळ आहे. क्रोएशियामध्ये १००० हून अधिक बेटे आहेत, ज्यामुळे या देशाची शोभा वाढली आहे. क्रोएशिया हा युरोपमधील सर्वात जुन्या देशांपैकी एक मानला जातो आणि त्याचे पूर्ण नाव क्रोएशिया प्रजासत्ताक आहे. जगातील सर्वात लहान शहर HUM देखील क्रोएशियामध्ये आहे आणि त्याची लोकसंख्या सुमारे २५ लोक इतकी आहे.
क्रोएशियाचा जीडीपी ८४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका असून, त्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन, सेवा क्षेत्र आणि उत्पादन उद्योगांवर अवलंबून आहे. क्रोएशियाकडे नैसर्गिक संसाधने देखील आहेत, जी त्यांच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देतात.
क्रोएशियाची लोकसंख्या सुमारे ३८ लाख आहे. लोकसंख्येच्या बाबतीत हा देश जगात १२८ व्या क्रमांकावर आहे. क्रोएशियाचे क्षेत्रफळ हिमाचल प्रदेशाइतके आहे. जर आपण क्रोएशियाच्या लोकसंख्येबद्दल बोललो तर येथील लोकसंख्या मुंबई-पुण्यासारख्या शहरांपेक्षाही कमी आहे.