पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानच्या दौऱ्यावर असून रात्री अबू रोड परिसरात सभेला संबोधित करण्यासाठी ते पोहोचले होते. मात्र या ठिकाणी पोहोचण्यास नरेंद्र मोदींना उशीर झाला. यामुळे नरेंद्र मोदींनी मायक्रोफोन वापरत सभेला संबोधित करण्यास नकार दिला. आपल्याला लाऊडस्पीकरसंबंधीच्या नियमाचं पालन करायचं आहे असं सांगत मोदींनी सभेला संबोधित करण्यास नकार देत उपस्थितांची माफी मागितली.

नरेंद्र मोदींनी माईकचा वापर न करताच तेथील उपस्थितांशी संवाद साधल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नरेंद्र मोदी आपण संबोधित करु शकत नसल्याने माफी मागत आहेत. तसंच आपण पुन्हा एकदा सिरोहीला येऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं.

मोदी माफी मागताना काय म्हणाले?

“मला येथे पोहोचण्यास उशीर झाला. मी नियमांचं पालन केलं पाहिजे अशी माझी विवेकबुद्धी मला सांगत आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांची माफी मागत आहे,” असं मोदींनी माईक आणि लाऊडस्पीकरचा वापर न करता उपस्थितांना सांगितलं.

पुढे ते म्हणाले “पण मी तुम्हाला आश्वासन देतो की, मी पुन्हा येईल. तुम्ही दिलेलं प्रेम आणि आपुलकीची नक्की परतफेड करेन”. यानंतर नरेंद्र मोदींनी मंचावर वाकून नमस्कार केला आणि ‘भारत माता की जय’ अशी घोषणा दिली.

अनेक भाजपा नेत्यांनीही नरेंद्र मोदींचा सभेतील व्हिडीओ शेअऱ केला असून नियमांचं पालन केल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे.

काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. गुजरातमधील अंबाजी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर नरेंद्र मोदी राजस्थानमध्ये पोहोचले होते.