औरंगाबाद, बेगुसराय : घराणेशाहीतून राजकारणात आलेल्यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची भीती वाटत असून ते राज्यसभेच्या मार्गाने संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील औरंगाबादमध्ये बोलताना केली. भ्रष्टाचार, घराणेशाहीचे राजकारण यावर पांघरूण घालण्यासाठी काँग्रेस आणि राजदने दलित आणि इतर वंचित घटकांचा वापर करून घेतला असा आरोप त्यांनी केला.

मोदी यांनी शनिवारी औरंगाबाद आणि बेगुसराय येथे जाहीर सभांमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसला लक्ष्य केले. यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार हेही त्यांच्याबरोबर व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचा >>> भाजपाकडून बॉलिवूडसह भोजपुरी, दाक्षिणात्य आणि बंगाली कलाकारांना लोकसभेची उमेदवारी; वाचा यादी

औरंगाबादमधील सभेत काँग्रेस-राजद आघाडीवर टीका करताना मोदी म्हणाले की, ‘‘घराणेशाहीने सत्तेवर आलेल्यांना आणि लोकांच्या मनात दहशत बसवणाऱ्यांना रालोआने काठावर ढकलले आहे’’. बिहारमध्ये विकास, कायद्याचे राज्य आणि महिलांना भीतीमुक्त जीवन मिळेल याची खबरदारी घेणे ही आपली हमी असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. राज्यातील आधीच्या पिढ्या भीतीमध्ये जगत होत्या आणि त्यांनी स्थलांतर करावे लागले. आपण तो काळ पुन्हा येऊ देता कामा नये असे म्हणत त्यांनी राजदवर टीका केली.

यावेळी बोलताना मोदी यांनी बिहारमध्ये पुन्हा एकदा दुहेरी-इंजिन सरकार आल्याचा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, बिहार ही देवी सीतेची भूमी असून अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर राज्यातील उत्साह जाणवण्यासारखा होता. माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मिळणे हा संपूर्ण बिहारचा सन्मान असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> भाजपाने दिग्गजांचे पंख छाटले, स्वराज यांच्या मुलीला उमेदवारी, शिवराज सिंह चौहानांबाबत मोठा निर्णय; महाराष्ट्रातला नेता यूपीच्या मैदानात

बेगुसरायमध्ये बोलताना मोदी यांनी माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांना अडचणीत आणणाऱ्या नोकऱ्यांसाठी जमीन घोटाळ्याचा उल्लेख केला. काँग्रेस आणि राजदने सामाजिक न्यायाचा विश्वासघात केला असा आरोप त्यांनी केला.

कायम रालोआमध्येच राहणार नितीशकुमार

औरंगाबादमधील सभेत बोलताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपण यापुढे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्येच राहणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. ‘‘तुम्ही यापूर्वी बिहारमध्ये आला होता त्यावेळी मी काही काळ रालोआमध्ये नव्हतो, आता मात्र रालोआमध्येच राहणार आहे’’, असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१.६२ लाख कोटींच्या प्रकल्पाचे उद्घाटन

बेगुसराय : पंतप्रधान मोदी यांनी बेगुसरायमध्ये तेल आणि वायू क्षेत्रातील १.६२ लाख कोटींच्या अनेक प्रकल्पांना सुरुवात केली. हे प्रकल्प बिहार, हरियाणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उभारले जाणार आहेत. यावेळी त्यांनी काही रेल्वेसेवांनाही हिरवा झेंडा दाखवला.