Donald Trump is Fighting Silently Against India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एकाबाजूला सोशल मीडियावरून पंतप्रधान मोदींच्या मैत्रीच्या आणाभाका घेत असताना दुसऱ्या बाजूला ते भारताविरोधात एकामागून एक निर्णय घेत आहेत. टॅरिफनंतर त्यांनी आता अमेरिकेत जाऊन नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. रविवारपासून एच-१बी व्हिसावर वार्षिक १ लाख डॉलर्सचे शुल्क लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींचे नाव घेत उपरोधिक टोला लगावला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एच-१बी व्हिसा असणाऱ्यांना रविवारपासून प्रवेश नाकारला आहे. एच-१बी व्हिसाधारकांच्या कंपन्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी प्रतिवर्ष १ लाख डॉलर्सचे शुल्क भरणार असतील तरच या व्हिसाच्या मार्फत कर्मचाऱ्याला प्रवेश दिला जाणार आहे. यापूर्वी एच-१बी व्हिसासाठी जवळपास १००० डॉलर्सचा खर्च येत होता.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतातील आयटी कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, असे सांगितले जाते. एच-१बी व्हिसाच्या माध्यमातून दरवर्षी अमेरिकेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये ७० टक्के प्रमाण एकट्या भारताचे आहे. या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर उपरोधिक टीका केली आहे.
मोदींचे मित्र ट्रम्प भारताविरोधात शांतपणे लढतायत
प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर भाष्य केले. ते म्हणाले, अमेरिकेने आधी भारताकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानच्या बाजूने आपले प्रेम दाखवले. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना थेट व्हाईट हाऊसमध्ये जेवणासाठी बोलावले.
“त्यानंतर अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावले. आता एच-१बी व्हिसासाठी शुल्कवाढ करून भारतीय कौशल्याची कुचंबणा करू पाहत आहेत. ही भारताविरोधात शांतपणे लढली जाणारी लढाई आहे आणि याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत”, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
कमकुवत पंतप्रधान, राहुल गांधींचीही टीका
तर काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. त्यांनी एक्सवर एक जुनी पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, “मी पुन्हा सांगतो, भारताला कमकुवत पंतप्रधान लाभले आहेत.”
या पोस्टसह राहुल गांधी यांनी एच-१बी व्हिसासंबंधी शुल्क वाढवल्याची बातमीही जोडली आहे. २०१७ सालीही त्यांनी पंतप्रधान मोदींवर अशाच प्रकारची टीका केली होती. तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट दिले आहे.