रक्षकच भक्षक बनल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस हवालदाराच्या ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात घडली आहे. येथील उपनिरीक्षकास पोलीस लाईन परिसरात तैनात करण्यात आलं होतं. पण, राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुवास पोलीस ठाण्यात कर्तव्यासाठी येण्याचे निर्देश उपनिरीक्षकास देण्यात आले होते.
हेही वाचा : महावितरणमधील अपंग कर्मचारी महिलेचा विनयभंग प्रकरणात अभियंत्यासह तिघांवर गुन्हा
त्यानुसार राहुवास येथील एका सहकारी हवालदाराच्या घरी उपनिरीक्षक भाड्यानं राहत होता. तेव्हा, शेजारी राहत असलेल्या दुसऱ्या हवालदाराची ४ वर्षीय मुलगी अंगणात खेळत होती. यावेळी उपनिरीक्षकाची वक्रदृष्टी या चिमुरडीवर पडली. उपनिरीक्षकाने चिमुरडीला आमिष दाखवून खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.
चिमुरडीने अत्याचाराची माहिती आईस सांगितली. नंतर जयपूर पोलीस ठाण्यात हवालदार असलेले चिमुरडीचे वडील रात्री कामावरून घरी आले. तेव्हा सगळी माहिती त्यांना देण्यात आली. त्यांनी तातडीनं राहुवास पोलीस ठाणे गाठून उपनिरीक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. यानंतर स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर पोलिसांनी उपनिरीक्षकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
हेही वाचा : वय वर्षे १७ आणि काम वेश्यागमनसाठी मॉडेल , टिव्ही मालिकेतील महिला कलाकार पुरवणे; वाचा धक्कादायक प्रकार
याप्रकरणी दौसाच्या पोलीस अधीक्षक वंदिता राणा म्हणाल्या की, “वडिलांच्या तक्रारीनंतर आरोपी उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे.” तर, “अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला मदत केली जाईल,” असं आश्वासन आरोग्यमंत्री परसादी लाल मीना यांनी दिलं आहे.