तालिबान स्वतःला बदललेला तालिबान म्हणवतात आणि शरियतच्या कक्षेत महिलांना स्वातंत्र्य देण्याविषयी बोलतात. इतकंच काय तर तालिबानने आपल्या पत्रकार परिषदेत असा दावा केला आहे कि, “अफगाणिस्तानमधील नवीन सरकारमध्ये प्रत्येकजण सहभागी होईल. तालिबान पुरुषांना महिलांशी बोलण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल.” पण जगाला माहित आहे कि, तालिबानचे हे सगळे दावे फक्त जगाला दाखवण्यासाठी आहेत. प्रत्यक्षात सत्य यापेक्षा फार वेगळं आणि भयावह आहे. भारतात आलेल्या अफगाणिस्तानच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने याबाबतचा धक्कादायक खुलासा केला आहे. या महिलेसोबत तालिबान्यांनी क्रूरतेचा सर्व मर्यादा ओलांडत चक्क या महिला अधिकाऱ्याचे डोळे काढले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तालिबानच्या क्रूरतेने तिची स्वप्नं पायदळी तुडवली

तालिबानच्या क्रूरतेच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. पण, एक महिला पोलीस अधिकारी असलेल्या खातिरा हाश्मी हिच्यावरील अत्याचाराचा कहर झाला. या तिचं संपूर्ण आयुष्य अंधारात बुडालं आहे आणि ती पुन्हा कधीही प्रकाश पाहू शकणार नाही. खातिरा हाश्मी या अफगाणिस्तानच्या गझनी प्रांताच्या पोलीस विभागात महिला अधिकारी होत्या. पोलिसात सामील होणं हे खातिराचं स्वप्न होतं. तिने पोलिसात भरती होण्याचा निर्णय खूप पूर्वीच घेतला होता. खातिराला माहीत होतं की, महिलांनी काम करणं हे तालिबान्यांसाठी अपमानास्पद आहे. तरीही ती पोलिसात जाण्याच्या आपल्या निर्णयापासून मागे हटली नाही.

खातिराला माहित होतं की, ती घराबाहेर कामावर गेली आहे हे तालिबानला कळेल. अखेर एक दिवस तालिबान्यांचा फोन आला. त्यावेळी जरी खातिरा तालिबान्यांपासून सत्य यशस्वी झाली, तरीही हे फार काळ टिकणार नव्हतं. कारण, एक दिवस तालिबानी तिच्या घरी आहे. याचवेळी तालिबानच्या क्रूरतेने खातिराची स्वप्नं पूर्णपणे पायदळी तुडवली. खातिरा आणि तिच्या पतीला संशय होता की तालिबानी असलेल्या खातिराच्या वडिलांनीन तिच्यावर हल्ला करण्याचा आदेश दिला होता. कारण, त्यांना तिचे पोलीस कर्मचारी म्हणून काम करणं पसंत नव्हतं.

तालिबानी घाबरले होते, म्हणून…

महिला पोलीस अधिकारी खातिरा हाश्मी यांच्यावर ७ जून २०२० रोजी संशयित तालिबानी गटाने हल्ला केला. याबाबत सांगताना खातिरा म्हणाली कि, “त्यांच्यापैकी दोघांकडे बंदुका होत्या. जेव्हा त्यांनी मला गोळ्या घातल्या तेव्हा गोळ्या माझ्या पाठीवर आणि हाताला लागली. तरीही मी उभी राहू शकत होते. पण जेव्हा माझ्या डोक्यात एक गोळी लागली तेव्हा मला कळत नव्हता की नेमकं काय सुरु आहे आणि त्यानंतर मी जमिनीवर कोसळले.” दरम्यान, तालिबानी इथेच थांबले नाहीत तर त्यांनी खातरा हाश्मीच्या डोळ्यात चाकूने वार केले. खातिरा म्हणाली, “तालिबानी घाबरले होते कारण मी त्यांना पाहिलं होतं. त्यामुळे त्यांनी माझे डोळे काढले.”

तालिबान्यांचा हा खरा आणि महाभयंकर चेहरा आहे. खातिरा हाश्मी ही फक्त या क्रूरतेच्या कथेचा एक छोटासा भाग आहे. खरंतर अफगाणिस्तानच्या प्रत्येक कोपऱ्यात तालिबान्यांच्या अत्याचाराच्या कथा ताज्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police woman assaulted by taliban gst
First published on: 31-08-2021 at 15:44 IST