KK Mishra on Pragya Singh Thakur’s advice to Girls Parents : मध्य प्रदेशमधील भोपाळच्या माजी खासदार व भाजपा नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अलीकडेच एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी मुलींच्या पालकांना दिलेल्या एका सल्ल्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी हिंदू समुदायाला आवाहन केलं की “तुमची मुलगी तुमचं ऐकत नसेल, परधर्मीय इसमाबरोबर पळून जाण्याचा, लग्न करण्याचा विचार करत असेल, तसा प्रयत्न करत असेल तर तिचे पाय तोडून टाका. मन थोडं कठोर करा. परंतु, मुलीचे पाय तोडताना मागे हटू नका.”
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस नेते के. के. मिश्रा यांनी पलटवार केला आहे. मिश्रा यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की “दीपावलीच्या पूर्वसंध्येला प्रज्ञा ठाकूर यांनी हिंदू समुदायाला आवाहन केलं आहे की त्यांची मुलगी दुसऱ्या धर्मातील (मुस्लीम) इसमाशी लग्न करण्याचा प्रयत्न करत असेल तर आधी तिला समजवा, तरी तिने ऐकलं नाही तर तिचे पाय तोडून टाका. परंतु, तुम्ही लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित रामलाल यांच्या भाच्या, सुब्रह्मण्यम स्वामी यांची मुलगी आणि शाह नवाज हुसैन यांच्या पत्नीसहीत डझनभर भाजपा नेत्यांच्या घरातील मुलींचे पाय तोडायला जाणार आहात का? कारण या सर्व महिलांनी ‘तुमच्या भाषेत’ परधर्मीयांशी (मुस्लीम) लग्न केली आहेत.”
के. के. मिश्रांचं प्रज्ञा ठाकूर यांना आव्हान
काँग्रेस नेते के. के. मिश्रा साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना आव्हान देत म्हणाले, “परधर्मीय कोण आहेत? तुम्ही त्यांच्या धन्यांचे केवळ पायच नव्हे तर हात देखील तोडा. तुमच्यात हिंमत आहे का? की तुम्ही फक्त बोगस गप्पा करणार आहात.”
प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या होत्या की “आपण आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठीच कठोर निर्णय घेत असतो. त्यांच्या भल्यासाठी त्यांना मारझोड करावी लागली तर त्यात मागे हटू नका. आई-वडील केवळ मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी अशी पावलं उचलतात. ज्या मुलीवर आपण प्रेम केलं, फुलासारखं जपलं, मोठं केलं तीच मुलगी मोठी होऊन मियाँइन (मुस्लीम मुलाबरोबर लग्न करू इच्छित असेल) होऊ पाहात असेल, आपले संस्कार सोडून वागत असेल, तर तिचे पाय तोडा.”