Pragya Singh Thakur advice to Girls Parents : मध्य प्रदेशमधील भोपाळच्या माजी खासदार व भाजपा नेत्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी मुलींच्या पालकांना दिलेल्या एका सल्ल्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, “तुमची मुलगी तुमचं ऐकत नसेल, इतर धर्मातील इसमाबरोबर जाण्याचा, लग्न करण्याचा विचार करत असेल तर तिचे पाय तोडून टाका. मन थोडं कठोर करा. परंतु, मुलीचे पाय तोडताना मागे हटू नका.”

प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, मुलींचा सांभाळ करताना कठोर व्हावं लागलं तर व्हा, तेव्हा रडू आलं तर रडा, पण मन कठोर करा. इतकं कठोर करा की आपली लेक आपलं ऐकत नसेल, दुसऱ्या धर्मातील इसमाकडे जायचा प्रयत्न करत असेल तर तिचे पाय तोडताना कुठलीही कसर ठेवू नका. मुलगी ऐकत नसेल तर तिला फटके द्यायला पाहिजेत. तिला फटकावताना मागेपुढे पाहू नका.

…तर मुलांना मारझोड करताना मागे हटू नका : साधी प्रज्ञा सिंह ठाकूर

भाजपाच्या माजी खासदार म्हणाल्या, “आपण आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठीच कठोर निर्णय घेत असतो. त्यांच्या भल्यासाठी त्यांना मारझोड करावी लागली तर त्यात मागे हटू नका. आई-वडील केवळ मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी अशी पावलं उचलतात.

लव्ह जिहादवरून प्रज्ञा ठाकूर यांचं वक्तव्य

“आपल्या घरी मुलगी जन्माला येते तेव्हा सगळेजण प्रसन्न होतात. सर्वांना बरं वाटतं. मुलीच्या आईला सर्वाधिक आनंद होतो. ती म्हणते की आपल्या घरी लक्ष्मी आली आहे, आपल्या घरी सरस्वती आली आहे. सगळेजण शुभेच्छा देतात, अभिनंदन करतात. परंतु, तीच मुलगी मोठी होऊन मियाँइन (मुस्लीम मुलाबरोबर लग्न करू इच्छित असेल) होऊ पाहात असेल, आपले संस्कार सोडून वागत असेल, तर तिचे पाय तोडा.”

“…अशा मुलींच्या बाबतीत सतर्क राहा”

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, “मुलगी आई-वडिलांचं ऐकत नसेल, मोठ्यांचा सन्मान करत नसेल तर अशा मुलींच्या बाबतीत सतर्क राहा. त्यांच्यावर लक्ष ठेवा. मुलींना जास्त जपा. त्या वाकडं पाऊल टाकत असतील तर त्यांना समजावून, मारझोड करून, त्यांच्यावर रागावून घरात ठेवा, पण चुकीच्या मार्गाने जाऊ देऊ नका. अशा मुलींच्या बाबतीत तुम्हाला थोडं कठोर व्हावं लागेल. कठोर कसं व्हायचं ते शिकावं लागेल. त्यांच्यावर काही निर्बंध लावावे लागतील, ते लावा, पण मुलींना नियंत्रणात ठेवा.”