द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या या शपथविधीला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित सर्व मोठे नेते उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. यानंतर देशाला संबोधित करत द्रौपदी मुर्मू यांनी आपला जीवनप्रवास मांडला. तसंच करोना काळात केंद्र सरकारने केलेल्या कामाचं कौतुकही केलं.

“आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना मला ही संधी मिळाली आहे. देश आपल्या स्वातंत्र्याची ५० वर्ष साजरी करत असताना, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती. आज ७५ व्या वर्षात मला ही नवी संधी मिळाली आहे. २५ वर्षाचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत असताना ही जबाबदारी मिळणं माझं सौभाग्य आहे,” असं सांगत द्रौपदी मुर्मू यांनी सर्व आमदार, खासदार तसंच देशवासियांचे आभार मानले.

Presidential Oath Ceremony: देशाला मिळाल्या नव्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी घडवला इतिहास

“स्वतंत्र भारतात जन्म झालेली मी पहिली राष्ट्रपती आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी नागरिकांकडून ज्या अपेक्षा केल्या आहेत, त्यांची पूर्तता करण्यासाठी गतीने काम करावं लागणार आहे. ‘सबका प्रयास, सबका कर्तव्य’ या मार्गावर वाटचाल करावी लागणार आहे. भारताच्या उज्वल भविष्याचा प्रवास सर्वांच्या सोबतीने करायचा आहे,” असं आवाहन त्यांनी केलं.

“ओडिशामधील छोट्याश्या आदिवासी गावातून माझा प्रवास सुरु झाला होता. तिथे प्राथमिक शिक्षण मिळणंही स्वप्नाप्रमाणे होतं. पण अनेक अडथळ्यांनंतरही मी संकल्प सोडला नाही. कॉलेजमध्ये जाणारी माझ्या गावातील मी पहिली व्यक्ती होती,” असं मुर्मू यांनी सांगितलं.

“वॉर्ड काऊन्लिसर ते देशाच्या राष्ट्रपती होण्याची संधी मला मिळाली आहे. ही भारताची महानता असून लोकशाहीची ताकद आहे. यामुळेच एका गरिब घरातील जन्मलेली मुलगी देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकते. राष्ट्रपती होणं माझं वैयक्तिक यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचं यश आहे. भारतात गरीब स्वप्न पाहू शकतो आणि पूर्णही करु शकतो हेच यामधून सिद्ध होत आहे. अनेक वर्ष सुविधांपासून वंचित राहिलेल्या दलित, गरीब आदिवासी माझ्यात आपलं प्रतिबिंब पाहू शकतात,” असंही द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं.

देशातील गरिबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. देशातील करोडो महिला आणि मुलींच्या स्वप्न आणि सामर्थ्याची झलक आहे असंही मुर्मू यांनी सांगितलं. प्रगतशील भारताचं नेतृत्व करताना मला अभिमान वाटत आहे. सर्व देशाविसायांना आणि खासकरुन तरुण, महिलांना आश्वस्त करु इच्छिते की, त्यांच्या हिताला प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन मुर्मू यांनी दिलं आहे.

“देशाला राष्ट्रपतीपदाची मोठी परंपरा असून मी पूर्ण निष्ठेने कर्तव्याचं पालन करेन. सर्व देशवासीय माझ्या ऊर्जेचे स्तोत्र असतील,” असं प्रतिपादन मुर्मू यांनी केलं.

“भारत आज प्रत्येक क्षेत्रात विकास करत आहे. करोना काळात भारताने जे सामर्थ्य दाखवलं, त्यामुळे संपूर्ण जगाला आपल्यासोबत पुढे नेण्याचं काम केलं. आपण भारतीयांनी आपल्या प्रयत्नांनी फक्त जागतिक संकटाचा सामना केला नाही, तर जगासमोर नवे मापदंडही ठेवले. काही दिवसांपूर्वी आपण २०० कोटी डोस देण्याचा विक्रम केला आहे. या संपूर्ण लढाईत भारताने दाखवलेला संयम, साहस आपली शक्ती आणि संवदेनशीलतेचं प्रतीक आहे. भारताने जगालाही मदत केली. आज जग भारताकडे नव्या विश्वासाने पाहत आहे,” असं गौरवौद्गार द्रौपदी मुर्मू यांनी काढले.

“देशातील महिला, मुली जास्तीत जास्त सक्षम झाल्या पाहिजेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी योगदान दिलं पाहिजे. तरुण फक्त आपलं भविष्य निर्माण करत असून देशाच्या भविष्याचा पायाही रचत आहेत. माझं तुम्हाला नेहमी पाठिंबा असेल,” असं आश्वासन मुर्मू यांनी दिला.

“निसर्गासोबत समतोल साधत जगणाऱ्या समाजात माझा जन्म झाला आहे. निसर्ग, जलाशय यांचं महत्व मी अनुभवलं आहे. आम्ही निसर्गाकडून गरजेच्या गोष्टी घेताना त्याची सेवाही करतो. भारत पर्यावरण संरक्षण क्षेत्रात जगाचं मार्गदर्शन करत आहे याचा मला अभिमान आहे,” असं मुर्मू यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपलं हित आणि हितापेक्षा मोठं जगाचं कल्याण करायचं असतं. हा विश्वास पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल,” असं मुर्मू यांनी सांगितलं. पुढे वाटचाल करुयात आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती करुयात असं आवाहनही त्यांनी शेवटी केलं.