पीटीआय, चेन्नई

वादळग्रस्त तमिळनाडूला मदतीचा दुसरा हप्ता म्हणून ४५० कोटी रुपये देण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी चेन्नई येथे सांगितले.

चेन्नई आणि आसपासच्या वादळग्रस्त भागांची हवाई पाहणी केल्यानंतर आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याशी सचिवालयात उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर राजनाथ म्हणाले,‘‘तमिळनाडूत वादळी पाऊस आणि पूर यांमुळे झालेल्या प्राणहानीबद्दल पंतप्रधान मोदी यांना तीव्र दु:ख झाले असून मदतीचा पहिला ४५० कोटींचा हप्ता तमिळनाडूला आधीच देण्यात आला आहे. तर ४५० कोटी रुपयांचा दुसरा हप्ता देण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत.’’ मिचौंग वादळाचा तडाखा बसल्याने मोठी हानी झालेल्या तमिळनाडूने केंद्राकडे पाच हजार ६० कोटींची मदत मागितली होती.चेन्नईसह अन्य काही जिल्ह्यांतील काही भाग अद्याप पाण्याखाली आहेत. चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपेट या जिल्ह्यांमध्ये मदतकार्य वेगाने सुरू आहे.

हेही वाचा >>>लोकसभेच्या तयारीला लागा! भाजप खासदारांना पंतप्रधानांचा सल्ला

ओडिशात मुसळधार..  भुवनेश्वर : ओडिशालाही अवकाळी पावसाने झोडपून काढले असून सुंदरगड जिल्ह्यातील शाळां आणि अंगणवाडय़ांना गुरुवारी सुट्टी देण्यात आली होती. अवकाळी पावसाने राज्याचे तापमानही पाच अंशाने घसरले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंध्रलाही ४९३.६० कोटी

मिचौंग वादळाचा तडाखा बसलेल्या आंध्र प्रदेशला केंद्राच्या मदतीचा दुसरा हप्ता म्हणून ४९३ कोटी ६० लाख, तर तमिळनाडूला ४५० कोटी रुपये देण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्रालयाला दिले आहेत, असे गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी नागरी पूर निवारण प्रकल्पाअंतर्गत ५६१ कोटी २९ लाख रुपयांचे साह्यही चेन्नईला मंजूर केले आहेत, असेही शहा यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे.

(चेन्नईचा बराचसा भाग सलग तिसऱ्या दिवशी पाण्याखाली आहे.)