पीटीआय, रतलाम/दुर्ग

देशातील ८० कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य पुरवणाऱ्या ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने’ला आणखी पाच वर्षे मुदतवाढीचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी निवडणूक प्रचारसभेत दिले.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाहीर सभा घेतल्या. दोन्ही ठिकाणच्या प्रचारसभांमध्ये त्यांनी केंद्राची मोफत धान्यपुरवठा योजना आणखी पाच वर्षे सुरू ठेवण्याचे जाहीर केले.‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ करोना महासाथीच्या काळात, टाळेबंदी आणि अर्थचक्र थंडावल्याचा फटका बसलेल्या गरिबांसाठी २०२० मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे पाच किलो अन्नधान्य मोफत पुरवण्यात येते.

‘महादेवा’लाही बघेल यांनी सोडले नाही..

कथित ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅप घोटाळय़ावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी महादेवालाही सोडले नाही. या प्रकरणातील आरोपींशी आपला काय संबंध आहे हे बघेल यांनी जाहीर करावे, असे आव्हान मोदी यांनी दिले.