रेल्वेने प्रवास करताना जर कोणत्याही कारणामुळे ती रखडली आणि वेळेत निश्चितस्थळी पोहोचू शकली नाही तर आपण वैतागतो . पैसे देऊनही वेळ पाळू न शकल्याने आपली चिडचिड होते, हे स्वाभाविकच आहे. मात्र, जर रेल्वे उशीराने पोहोचल्यामुळे तुम्हाला याची भरपाई देण्यात आली तर तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. पण हे शक्य आहे का? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हो हे शक्य आहे. कारण, नुकतीच अहमदाबाद-मुंबई ‘तेजस एक्स्प्रेस’ ही खासगी तत्वावर चालणारी रेल्वे तब्बल दीड तास उशीराने मुंबईत पोहोचली. त्यानंतर रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशने (आयआरसीटीसी) यातील ६३६ प्रवाशांना भरपाईपोटी प्रत्येकी १०० रुपये परत केले आहेत.

आयआरसीटीसीने अशा प्रकारे प्रवाशांना भरपाई देण्याची घटना नवी नाही. कारण यापूर्वी लखनऊ-दिल्ली ‘तेजस एक्स्प्रेस’ ही देशातील पहिली खासगी रेल्वे दिल्लीत उशीराने पोहोचली होती. त्यावेळीही या गाडीतील सर्व प्रवाशांना आयआरसीटीसीकडून भरपाई देण्यात आली होती.

दरम्यान, अहमदाबाद-मुंबई ‘तेजस एक्स्प्रेस’ बुधवारी दुपारी तब्बल दीड तास उशीराने मुंबई सेन्ट्रल स्थानकात पोहोचली. त्यानंतर आयआरसीटीसीने त्यांच्या धोरणानुसार, प्रत्येक प्रवाशाचे व्हेरिफिकेशन केले. त्यानंतर त्यांना प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे तिकीटाचे पैसे परत करण्यात आले.

काय आहे भरपाईचे धोरण?

रेल्वेच्या कॅन्सलेशन पॉलिसीनुसार, जर रेल्वे गाडीला इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी एक तासापेक्षा अधिक काळासाठी उशीर झाला तर प्रत्येक प्रवाशाला १०० रुपये परत केले जातात. तसेच दोन तासांपेक्षा अधिक काळ उशीर झाल्यास प्रत्येक प्रवाशाला २५० रुपये भरपाईपोटी परत केले जातात. यासाठी प्रवाशी 18002665844 या क्रमांकावर फोन करुन किंवा आयआरसीटीसीला ई-मेलद्वारे संपर्क करुन भरपाईचा दावा करु शकतात. मात्र, यासाठी प्रवाशांना रद्द केलेला चेक, पीएनआर क्रमांक आणि प्रवासाचे इन्शूरन्स सर्टिफिकेट सादर करावे लागते.