नवी दिल्ली : अदानी-अंबानींसारख्या उद्योजकांनी इतर राजकीय नेत्यांना, सरकारी कंपन्यांना आणि प्रसारमाध्यमांना विकत घेतले असेल. पण, ते राहुल गांधींना विकत घेऊ शकले नाहीत आणि त्यांना कधीही विकत घेताही येणार नाही, असा हल्लाबोल काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी केला.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेने मंगळवारी दिल्लीतून उत्तर प्रदेशात प्रवेश केला. त्यावेळी सीमेवरील लोणीमध्ये झालेल्या स्वागत समारंभात प्रियंका बोलत होत्या.‘भारत जोडो’ यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून मंगळवारी यात्रेने दिल्लीतून उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश केला. प्रियंका गांधी-वढेरा या उत्तर प्रदेशच्या प्रभारी असल्याने त्यांनी यात्रेचे स्वागत केले. उत्तर प्रदेशातील चार दिवसांच्या प्रवासानंतर यात्रा हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाबमार्गे जम्मू-काश्मीरकडे रवाना होईल. ‘राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी केंद्र सरकारने हजारो कोटी रुपये खर्च केले. पण, राहुल गांधींनी सत्याचा मार्ग कधी सोडला नाही. त्यांच्या विरोधात तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला गेला, मात्र, त्यांना ते कधीही घाबरले नाहीत. ते योद्धय़ाप्रमाणे लढत आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेमध्येही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला गेला.

त्यामुळे या यात्रेचे उत्तर प्रदेशमध्ये स्वागत करताना अभिमान वाटत आहे’, असे प्रियंका म्हणाल्या. ‘राहुल गांधी आता पंजाबमध्ये जाणार असून तिथे थंडी वाढत जाईल, अजूनही ते टी शर्ट घालून पदयात्रेत चालत आहेत, त्यांना जॅकेट घालायला द्या. यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये जाणार असून त्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो, राहुल गांधींना भीती वाटत नाही का, असे मला विचारले गेले. पण, राहुल गांधींनी सत्याचे कवच घातले आहे. देव त्यांना सुरक्षितठेवेल’, असे प्रियंका गांधी-वढेरा म्हणाल्या.‘रॉ’चे माजी प्रमुख अमरजितसिंह दुलत, फारुक अब्दुल्ला सहभागी यात्रेमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव व बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सहभागी होण्यास नकार दिला असला तरी, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला, शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदी मंगळवारी यात्रेत सहभागी झाल्या. एवढेच नव्हे, तर ‘रॉ’चे माजी प्रमुख अमरजितसिंह दुलत हेदेखील राहुल गांधींसोबत यात्रेत चालताना दिसले. याआधी रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, अभिनेते कमल हासन आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर यात्रेत सहभागी झाले होते.

अयोध्येच्या पुजाऱ्यांचा आशीर्वाद
अयोध्येतील राममंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राहुल गांधींना यात्रेसाठी आशीर्वाद दिले आहेत. त्यांनी याबाबत राहुल गांधींना पत्र पाठविले असून ‘तुम्ही करत असलेले काम देशाच्या भल्यासाठी आहे,’ असे यात म्हटले आहे. मात्र आशीर्वाद देण्यापूर्वी प्रभू रामचंद्रांबाबत काँग्रेसचा इतिहास पाहावा, असे आवाहन करत विश्व हिंदू परिषदेने टीका केली. त्यावर ‘प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद हे मागणाऱ्या प्रत्येकासाठी असतात,’ असे प्रत्युत्तर दास यांनी दिले.