पंजाबच्या तर्न तरण जिल्ह्यातून पंजाब पोलिसांनी आज एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे. पहलगाम हल्ल्याचा सूड म्हणून भारतीय लष्करानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती ही कारवाई चालू असताना पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप या व्यक्तीवर आहे. या मोहिमेबद्दलची संवेदनशील माहिती पाकिस्तान इंटेलिजेन्स ऑपरेटिव्ह्ज अर्थात PIO ला दिली जात होती, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी या व्यक्तीकडून एक मोबाईल फोनदेखील ताब्यात घेतला असून त्यावरूनच ही माहिती पाठवली जात असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पाकिस्तानच्या ISI शी संपर्क
पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे पाकिस्तानमधील आयएसआय या गुप्तहेर संघटनेशी संबंध होते. या व्यक्तीला भारतीय लष्कर व ऑपरेशन सिंदूरबाबत संवेदनशील माहिती देण्याच्या मोबदल्यात पैसेही दिले जात होते. पंजाबच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून अधिकृत एक्स हँडलवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
यासंदर्भात पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव म्हणाले, “अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव गगनदीप सिंग उर्फ गगन असून तो तर्नतरण जिल्ह्याच्या मोहल्ला रोडूपूरमधील गली नझर सिंग वाली परिसरातील रहिवासी आहे. तर्नतरण पोलीस आणि पोलीस खात्याच्या काऊंटर इंटेलिजेन्स विंगनं राबवलेल्या संयुक्त कारवाईमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे”.
गगनदीपकडून लष्कर तैनातीची माहिती पाकिस्तानकडे
दरम्यान, गगनदीपनं लष्कर तैनात, महत्त्वाची ठिकाणं यासंदर्भातली संवेदनशील माहिती पाकिस्तान गुप्तहेर विभागाला पुरवण्यात आल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसेच, गेल्या पाच वर्षांपासून गगनदीप सिंग हा खलिस्तानी समर्थक गोपाल सिंग चावलाच्या संपर्कात होता. त्याच्याच माध्यमातून गगनदीप सिंगचा PIO शी संपर्क झाल्याचंही यादव यांनी सांगितलं.
मोबाईलमध्ये ISI चे क्रमांक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गगनदीपच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानला पुरवण्यात आलेली माहिती सापडली असून त्याचसोबत आयएसआयशी निगडित किमान २० व्यक्तींचे मोबाईल क्रमांकदेखील सापडले आहेत. या प्रकरणाचे आर्थिक व तांत्रिक धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.