पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’ समर्थित ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ (बीकेआय) नावाचे दहशतवादी मॉड्युल उद्ध्वस्त करण्यात पंजाब पोलिसांना यश आले. याप्रकरणात एका अल्पवयीन मुलासह तीन जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. हा गट अमृतसर परिसरात पोलिसांच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करून महत्त्वाच्या व्यक्तींची हत्या करण्याचा कट रचत होता, असे राज्याचे पोलीस प्रमुख गौरव यादव यांनी सांगितले.
‘एक्स’वरील संदेशात यादव म्हणाले, ‘गुप्तचर यंत्रणेच्या कारवाईअंतर्गत मोहाली येथील ‘स्टेट स्पेशल ऑपरेशन सेल’ने पाकिस्तानी ‘आयएसआय’ समर्थित ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ नावाचे दहशतवादी मॉड्यूल यशस्वीपणे उद्ध्वस्त केले. ब्रिटनस्थित निशान सिंग आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी हरविंदर रिंडा हे दोघे संबंधित मॉड्युलचे नेतृत्व करीत होते. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह तीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.’
‘कारवाईत दोन हातबॉम्ब, एक पिस्तूल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. सहजपाल सिंग आणि विक्रमजीत सिंग अशी दोघांची नावे असून, हे दोघेही अमृतसर ग्रामीणमधील रामदास येथील रहिवासी आहेत, तसेच एका अल्पवयीन मुलाचीही ओळख पटली आहे,’ असे ते म्हणाले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि स्फोटक कायद्याच्या विविध कलमांखाली मोहाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.