Pushpa 2 Stampede Case : अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मदान्ना यांचा पुष्पा २ चित्रपट गेल्या महिन्याभरापासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान हैदराबादमधील एका चित्रपटगृहात चेंगराचेंगरी झाली होती. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. अशात तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या एका दावामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहेत. एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी विधानसभेत दावा केला आहे की, चित्रपटगृहात चेंगराचेंगरी झाल्याचे कळाल्यानंतर एक अभिनेता कथितरित्या “आता चित्रपट हिट होईल”, असे म्हटला होता. त्यांनी विधानसभेच बोलताना हा दावा केला आहे.

हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये ४ डिसेंबर रोजी पुष्पा २ चित्रपटाच्या प्रीमियरचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुन चित्रपटगृहात आल्यानंतर त्याला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी केलेल्या गोंधळामुळे चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा आठ वर्षांचा मुलगा जमखी झाला होता.

काय म्हणाले ओवैसी?

सध्या तेलंगणा विधानसभेचे अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात काल बोलताना आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले की, “मला त्या प्रसिद्ध अभिनेत्याचे नाव घ्यायचे नाही कारण मला त्याला जास्त महत्त्व द्यायचे नाही. पण सर, माझ्या माहितीनुसार, तो अभिनेता चित्रपट पाहण्यासाठी एका थिएटरमध्ये गेला होता. प्रेक्षकांनी गोंधळ घातल्यानंतर, पोलीस आले आणि म्हणाले की चेंगराचेंगरी झाली आहे, दोन मुले खाली पडली असून, एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यावर अभिनेता हसला आणि म्हणाला की आता चित्रपट हिट होणार.”

एमआयएम पक्षाचे तेलंगणा विधानसभेत गटनेते असलेले आमदार अकबरुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले की, “चेंगराचेंगरीत दोन मुले अडकली. एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतरही त्याने (अभिनेत्याने) तिथेच बसून संपूर्ण चित्रपट पाहिला. त्यानंतर तो उठला पण त्यावेळीही त्याला चेंगराचेंगरीबाबत काही वाटले नव्हती. तो आपल्या कारमध्ये बसला आणि हात हलवत निघून गेला.”

हे ही वाचा : “माझ्यावरील १० कोटींचा दंड बीसीसीआयने भरावा”, ललित मोदींच्या मागणीवर उच्च न्यायालयाने ठोठावला आणखी एक लाखांचा दंड

अटक आणि सुटका

ही घटना घडल्यानंतर हैदराबाद पोलिसांनी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर अभिनेता अल्लू अर्जुन, त्याचे सुरक्षा पथक आणि चित्रपटगृह व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. एक रात्र तुरुंगात काढल्यानंतर अभिनेत्याची जामिनावर सुटका झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेनंतर तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही आक्रमक भूमिका घेत पोलीस प्रशासनाला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.