रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युद्धाला तोंड फुटले होते. २०२३ या वर्षाला निरोप देत असताना रशियाने काल (२९ डिसेंबर) युक्रेनवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केला. रशियाकडून युक्रेनवर अनेक क्षेपणास्त्र डागण्यात आली, तसेच ड्रोनने शहरांवर हल्ले केले गेले. या हल्ल्याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर भीषण हल्ला केल्यामुळे त्यांना युक्रेनला उध्वस्त करायचे आहे, असे दिसते. त्यामुळे पुतिन यांना आता थांबविण्याची गरज आहे, असे बायडेन यांनी म्हटले.
गुरुवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले की, रशियाने या वर्षातील सर्वात मोठा हल्ला केला आहे. जवळपास ११० क्षेपणास्त्र युक्रेनवर डागण्यात आले आहेत. या हल्ल्यात ३१ नागरिकांचा मृत्यू झाला असून १२० लोक जखमी झाले आहेत. युक्रेनियन यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाकडून केला गेलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.
रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, बायडेन यांनी म्हटले, “रशियाने केलेला हल्ला हा जगासाठी निर्वाणीचा इशारा आहे. विनाशकारी युद्धाच्या दोन वर्षानंतरही पुतिन यांचा उद्देश बदलला नाही. युक्रेनला पूर्णपणे उध्वस्त करून तेथील लोकांना स्वतःच्या अधीन करण्याचे त्यांचे धोरण दिसते. त्यामुळे पुतिन यांना आता थांबविले गेले पाहीजे.”
बायडेन पुढे म्हणाले, “रशियाकडून डागण्यात आलेले अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांना युक्रेनने हवेतच नष्ट केले. अमेरिका आणि सहयोगी देशांनी युक्रेनला जी हवाई सुरक्षा प्रणाली प्रदान केली होती, त्याचा योग्य वापर युक्रेनने केला.” रशियाचा निषेध करत असताना बायडेन यांनी अमेरिकी काँग्रेसलाही (कायदेमंडळ) आवाहन केले आहे. युक्रेनला यापुढेही मदत करण्यासाठी काँग्रेसची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. युक्रेनच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी त्यांना आवश्यक शस्त्रास्त्र आणि महत्त्वपूर्ण हवाई सुरक्षा प्रणाली वेळेवर द्यावी लागेल, असे बायडेन म्हणाले.
विशेष म्हणजे, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनला शस्त्रास्त्र आणि इतर मदतीसाठी २५० दशलक्ष डॉलरची तरतूद केल्याची घोषणा केल्यानंतर रशियाकडून युक्रेनवर हवाई हल्ला करण्यात आला आहे.
