भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेताना कलम ३७० रद्द करण्यापूर्वीच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारत काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यासाठी वातावरणनिर्मिती करीत असल्याचे पत्र गेल्या आठवडय़ात पाठवले होते.
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी रात्री कुरेशी यांच्या पत्राचा तपशील जाहीर केला असून कुरेशी यांनी १ ऑगस्टला हे पत्र संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष तसेच आमसभेचे अध्यक्ष यांना पाठवले होते.
कुरेशी यांनी या पत्रात काश्मीरमधील मानवाधिकार परिस्थिती ढासळल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर प्रत्यक्ष ताबा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यासाठी वातावरणनिर्मितीही केली जात आहे असे त्यांनी म्हटले होते. कलम ३५ ए व कलम ३७० काढून टाकण्याचे भारताचे प्रयत्न आहेत अशी भीतीही त्यात व्यक्त केली होती.
काश्मीरच्या लोकसंख्येची रचना बदलण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाकिस्तानचा विरोध आहे, असे सांगून त्यांनी म्हटले आहे की, भारताने सध्या जे प्रयत्न चालवले आहेत त्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या जम्मू-काश्मीरविषयक ठरावांचे उल्लंघन होत आहे. काश्मीरमधील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी सत्यशोधन पथक पाठवावे, अशी मागणीही त्यांनी पत्रात केली.
भारताने सीमेवर सैन्य वाढवले असून मानवी अधिकारांचे उल्लंघन करण्यात येत आहे याची संयुक्त राष्ट्रांनी गंभीर दखल घ्यावी असेही त्यांनी म्हटले होते.