काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये पोहोचली असून आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे ठरल्याप्रमाणे या यात्रेत सहभागी झाले आहेत. आज सकाळी कठुआपासून यात्रेला सुरुवात झाली. चार महिने फक्त टी शर्टवर काढणाऱ्या राहुल गांधींनी कठुआच्या थंडीपासून वाचण्यासाठी जॅकेट घातलेले पाहायला मिळाले. तर संजय राऊत यांनी गळ्यात भगवी मफलर घालून यात्रेत सहभाग घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर पासून तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. मागचे चार महिने कन्याकुमारीपासून दक्षिणेतली राज्य पायी चालत राहुल गांधी उत्तरेत पोहोचले. या चारही महिन्यात भारताच्या विविध भागांमध्ये तापमानात चढउतार होते. तरीही राहुल गांधी यांनी पांढरा टी शर्ट हा आपला स्टाईल आयकॉन केला होता. दिल्लीत भारत जोडो यात्रा आली असताना सात डिग्री अंश सेल्सियसमध्येही ते एका टी शर्टवरच दिसले होते.

राहुल गांधीच्या टी शर्टची चर्चा सोशल मीडियावरही बरीच रंगली. सुरुवातील भाजपाने आपल्या सोशल मीडियावर या टीशर्टची किंमत ४० हजारांच्या पुढे असल्याचे सांगत बरबरी ब्रँडचे टी शर्ट राहुल गांधी वापरतात, अशी पोस्ट टाकली. या पोस्टवर जवळपास लाखाहून अधिक कमेंट आल्या. युजर्सनी नरेंद्र मोदी यांच्या दहा लाखांच्या सुटवरुन भाजपाला प्रश्न विचारले आणि ट्रोल केले. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये यात्रा पोहोचल्यानंतर भाजपाच्यावतीने पुन्हा एकदा टीशर्टला टार्गेट करण्यात आले होते.

स्व. बाळासाहेब ठाकरे आणि काश्मीरचे भावनिक नाते

गांधी परिवाराने या देशासाठी बलिदान दिले. त्या परिवारातून आलेला एक तरुण देशाच्या एकतेसाठी, देशातील द्वेष-सूडभावना नष्ट करण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चार हजार किमी चालत निघाला आहे आणि जनता त्यांना पाठिंबा देत आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी होणे हे प्रत्येक भारतीयचे कर्तव्य आहे. ही यात्रा महाराष्ट्रात आली असताना आदित्य ठाकरे नांदेड येथे यात्रेत सहभागी झाले. यात्रेचा शेवटचा टप्पा जम्मू आणि काश्मीरमध्ये होणार आहे. २० जानेवारी रोजी ही यात्रा काश्मीरमध्ये पोहोचेल. त्यावेळी मी यात्रेत सहभागी होईल, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दोनच दिवसांपूर्वी दिली होती.

ते पुढे म्हणाले, “जम्मू आणि काश्मीर हा भूभाग देशासाठी अतिशय संवेदनशील राहिला आहे. स्व. बाळासाहेबांचेही या प्रदेशाशी भावनिक नाते होते. शिवसेनेतर्फे यावेळी मी भारत जोडो यात्रेत सहभागी होईल.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi bharat jodo yatra enter jammu kashmir sanjay raut joins kvg
First published on: 20-01-2023 at 09:37 IST